Wed, Feb 20, 2019 10:37होमपेज › Satara › आरक्षणासाठी कागदावरची लढाई करा : रामराजे

आरक्षणासाठी कागदावरची लढाई करा : रामराजे

Published On: Aug 12 2018 1:03AM | Last Updated: Aug 11 2018 10:27PMखंडाळा : वार्ताहर 

केवळ घोषणाबाजी, दगडफेक करुन आरक्षण मिळणार नाही. तर त्यासाठी कागदावरची लढाई करावी लागेल. राज्य पातळीवर शिक्षणासाठी मिळणारे आरक्षण वाढवून घेण्यासाठी जोर लावणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक - निंबाळकर यांनी केले. 

खंडाळा तहसिल कार्यालयासमोर दि. 3 पासून खंडाळा तालुका धनगर समाज कृती समितीच्या वतीने धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे यासाठी धरणे आंदोलन सुरू आहे. गेली 9 दिवस सुरु असणार्‍या आंदोलनस्थळी शनिवारी विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक - निंबाळकर, आ. मकरंद पाटील यांनी भेट दिली. यावेळी ना. रामराजे व आ. पाटील यांनी  आंदोलनकर्ते यांच्याशी संवाद साधला. 

यावेळी  ना. रामराजे म्हणाले, पारंपारिक पद्धतीने उपजिवीका करणार धनगर समाज पश्‍चिम महाराष्ट्रात अधिक आहे. या समाजाने मला राजकारणात वाढवले. आपण कोणतीही जातपात मानत नाही. होळमध्ये मल्हारराव होळकर यांचा जन्म झाला. त्या ठिकाणी त्यांचे स्मारक उभे करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. एखाद्या समाजाला नव्यानं आरक्षण द्यायच असेल, ज्याचा उल्लेख घटनेत नसेल तर त्यासाठी वेगळी पध्दत आहे.

1978 साली झालेल्या शिफारशीनुसार घटनेतील नियमानुसार झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. यावेळी कृती समितीचे रमेश धायगुडे, आनंदराव शेळके, नगराध्यक्षा लताताई नरुटे, बाळासाहेब शेळके, म्हस्कू आण्णा शेळके यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, धनगर समाजाच्यावतीने दि. 13 रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. यामध्ये खंडाळा तालुका धनगर कृती समिती सहभागी होेणार नसल्याचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे.