होमपेज › Satara › लग्‍नानंतर वर्‍हाडी मंडळींमध्ये राडा

लग्‍नानंतर वर्‍हाडी मंडळींमध्ये राडा

Published On: May 06 2018 1:11AM | Last Updated: May 05 2018 11:32PMकोरेगाव : प्रतिनिधी 

वेलंग शिरंबे (ता. कोरेगाव) येथील संस्कृती मंगल कार्यालयात नवरी मुलीच्या नातेवाईकाने डायनिंग हॉलमध्ये जेवण करताना तू मुलीचे फोटो का काढले व बघून का  हसलास? असा जाब विचारल्याच्या कारणावरून दोन्हीकडच्या वर्‍हाडी मंडळींमध्ये जोरदार हाणामारी झाली. त्यामध्ये लाकडी दांडकी व दगडांचा वापर करण्यात आला. या घटनेत चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. 

शिरंबे येथील हुंभे परिवाराचे  निगडी वंदन (ता. जि. सातारा) येथील वधूशी लग्‍न आयोजित केले होते. लग्‍नानंतर जेवणासाठी डायनिंग हॉलमध्ये वर्‍हाडी मंडळी जेवणास बसली होती. नवरी मुलीचा नातेवाईक संकेत मांडवे याने डायनिंग हालमध्ये येऊन सुशील सकुंडे यास तू मुलीचे फोटो का काढले व बघून का हसलास, असा जाब विचारला. त्यावरून शाब्दिक चकमक सुरू झाली. शब्दाने शब्द वाढत गेला. प्रकरण हमरीतुमरीवर गेले. दोन्ही बाजूकडील वर्‍हाडी मंडळी टोकाला गेली.

संतापाच्या भरात दोन्ही कडील जमावाने एकमेकावर दांडक्यांनी व दगडांनी हल्ला चढवला. यामध्ये दोन्ही गटातील अतुल तानाजी शेडगे व तुषार शेडगे (दोघे रा.निगडी वंदन), आशिष बापुराव हुंबे व सतिश हुंबे (रा.शिरंबे) असे चौघे गंभीर जखमी झाले. मारहाणीत जमावातील बहुसंख्य जणांना चांगलाच मुका मार बसला आहे. रहिमतपूर पोलिस ठाण्यात अतुल तानाजी शेडगे (रा.निगडी वंदन ता.जि.सातारा) व आशिष बापुराव हुंबे यांनी परस्परांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. 

रहिमतपूर पोलिसांनी  दोन चारचाकी गाडीतून आलेल्या संकेत मांडवे, चिल्या, आदित्य काटे, अतुल शेडगे, श्रीकांत घाडगे, मंगाश मांडवे, सुरज मांडवे, तुषार शेडगे (रा. सर्व निगडी वंदन) यासह शिरंबे येथील आशिष भोसले, विकास भोसले, यांसह आणखी अनोळखी दहाजणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तपास हवालदार प्रफुल्ल डोंबाळे करत आहेत.