Mon, Jun 17, 2019 18:31होमपेज › Satara › पाचवी व आठवी प्रवेशाचा बिगुल वाजला

पाचवी व आठवी प्रवेशाचा बिगुल वाजला

Published On: May 04 2018 1:49AM | Last Updated: May 03 2018 11:04PMसातारा : प्रतिनिधी

पाचवी व आठवीच्या प्रवेश प्रक्रियेचा बिगुल वाजला असून शाळा विद्यालयातून  दि. 7 मे ते 19 मे पर्यंत प्रवेश अर्ज वितरण करण्यात येणार आहेत. प्रवेश प्रक्रियेची दि. 31 मे रोजी पहिली सोडत काढण्यात येणार आहे. दरम्यान, प्रवेश प्रक्रियेवेळी काही अनियमितता अथवा गैरव्यवहार आढळून आल्यास संबंधित  शाळेची मान्यता रद्द करण्याची कारवाई केली जाईल, असा इशाराही माध्यमिक शिक्षण विभागामार्फत देण्यात आला.
निकालाच्या पार्श्‍वभूमीवर माध्यमिक शिक्षणाधिकारी देविदास कुलाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुरूवारी उपशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण विस्तार अधिकारी  व  शहरातील शाळा व विद्यालयाच्या मुख्याध्यापकांची बैठक संपन्न झाली. आरटीई निकषानुसार प्रवेश प्रक्रिया राबवण्याच्या सूचना रमेश चव्हाण यांनी मुख्याध्यापकांना दिल्या. तसेच एकही विद्यार्थी शाळा प्रवेशापासून वंचित राहिला नाही पाहिजे याची दखल मुख्याध्यापकासह शाळा प्रमुखांनी घेण्याची सूचना केली.

माध्यमिक शिक्षण विभागाने दिलेल्या सूचनाप्रमाणे प्रवेश प्रक्रिया राबवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. सर्व शाळांनी विद्यार्थी व पालकांना  कोणत्याही  प्रकारचा त्रास  होवू नये, याची  दक्षता घ्यावी. प्रवेश प्रक्रिया नियमांशी सुसंगतपणे पारदर्शीपणे पार पाडावी. यामध्ये काही अनियमितता अथवा गैरव्यवहार आल्यास शाळा मान्यता रद्द करण्याची गांभीर्यपूर्वक कारवाई केली जाईल. ज्या शाळांमध्ये प्रवेशासाठी जादा प्रवेश अर्ज येण्याची शक्यता आहे अशा शाळांच्या प्रवेशाबाबत निरीक्षक नेमण्यात येईल. तसेच प्रवेश  प्रक्रियेसंदर्भात रोजच्या रोज शाळा विद्यालयांनी आपला अहवाल शिक्षण विस्तार अधिकार्‍यांसह

माध्यमिक शिक्षण विभागाकडे सादर करण्याच्या सूचना रमेश चव्हाण यांनी दिल्या.पाचवी व आठवीसाठी  दि. 7 ते 19 मे  अखेर प्रवेश अर्ज वितरण व स्वीकारणे. दि. 20 ते 24 मे अखेर प्रवेश अर्जाची छाननी, दि. 25 मे रोजी  अर्जाची यादी शाळेच्या नोटीस बोर्डवर लावणे व त्याची  प्रत शिक्षणाधिकारी यांच्याकडे पाठवणे. दि. 26 ते 29 मे या कालावधीत यादीवर आक्षेप,  दि. 31 मे रोजी  पहिली सोडत 
(क्षमतेपेक्षा जास्त अर्ज नसल्यास सोडत काढण्याची गरज नाही), दि. 1 ते 5 जूनअखेर सोडत झाल्याबरोबर त्याच दिवशी पात्र विद्यार्थ्यांची यादी बोर्डवर प्रसिध्द करून प्रवेश देणे.दि. 11 जून रोजी  शिल्लक जागेसाठी गरज भासल्यास दुसरी सोडत व प्रवेश, दि. 12 ते 14 जून  दुसरी सोडतीमध्ये प्रत्यक्ष निवड झालेले विद्यार्थी व प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची  यादी शिक्षणाधिकार्‍यांच्याकडे पाठवणे. दि. 15 जून रोजी  प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागातून देण्यात आली.

Tags : Satara, Fifth, eighth, admissions