होमपेज › Satara › वर्येजवळ भीषण आग; गोडावून खाक

वर्येजवळ भीषण आग; गोडावून खाक

Published On: Jan 26 2018 1:16AM | Last Updated: Jan 25 2018 11:29PMलिंब : वार्ताहर

सातारा - पुणे जुन्या  महामार्ग-वरील वर्ये पुलाजवळील मंडपाच्या  गोडावूनला गुरुवारी सायंकाळी मोठी आग लागली. या आगीत गोडावूनचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.  अचानक लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले. रात्री उशिरापर्यंत 10 हून अधिक अग्निशामक दलाची वाहने आग विझवण्यासाठी शर्थीने प्रयत्न करत होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, वर्ये पुलाजवळ रमेश साळुंखे यांचे श्रीरंग मंडप आणि फ्लॉवर डेकोरेटरचे गोडावून आहे. हे गोडावून सुमारे दहा ते पंधरा गुंठे क्षेत्रात आहे. या ठिकाणी कळक, बांबू, मॅटिन, सोफा, खुर्च्या, टेबल, कमानी आदी मोठ्या प्रमाणात साहित्य होते. त्या गोडावूनला सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीने थोड्या वेळातच रौद्ररूप धारण केल्याने गोडावूनमधील लाखो रुपयांचे साहित्य जाळून खाक झाले.

या आगीची माहिती परिसरातील ग्रामस्थांना कळताच घटनास्थळी मोठी गर्दी केली. याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यात  माहिती देण्यात आल्यानंतर अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना , कूपर कंपनी, सातारा नगर पालिका यांच्या अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी येऊन आग आटोक्यात आणली .

यावेळी पालिकेचे नूतन उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे राजेंद्र चोरगे, नगरसेवक किशोर शिंदे यांच्यासह परिसरातील मान्यवर, ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीने  प्रयत्न केले. 

या आगीमुळे सातारा - पुणे या जुन्या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. ही आग पाहण्यासाठी  परिसरातील नागरिकांनी महामार्गावर मोठी गर्दी केली होती. वाहतूक सुरळीत करताना व लोकांना बाजूला घेण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. या परिसरातील ऊस जाळण्याच्या प्रकारामुळे गोडावूनला आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.