Thu, Mar 21, 2019 11:05होमपेज › Satara › पोलिस अधिकार्‍यावर जीवघेणा हल्ला 

पोलिस अधिकार्‍यावर जीवघेणा हल्ला 

Published On: May 20 2018 1:44AM | Last Updated: May 19 2018 10:42PMवेणेगाव : वार्ताहर 

देशमुखनगर येथे जुगार अड्ड्यावर कारवाईसाठी गेलेल्या बोरगाव पोलिस ठाण्याचे सपोनी संतोष चौधरी व पोलिस कर्मचार्‍यांना शकीला मुलाणी, समीर गुलाब मुलाणी (वय 28) आणि आमीर मुलाणी यांनी शिवीगाळ व दमदाटी केली. यावेळी त्यांनी चौधरी यांचा गळा आवळून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. दरम्यान, या जुगार अड्ड्यावरील कारवाईत 70 हजार 100 रुपयांचा माल जप्त करण्यात आला असून, सहाजणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, लिंबाचीवाडी येथील बामनाचा ओढा नावाच्या शिवारात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती सपोनि संतोष चौधरी यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत दुधाणे, हवालदार किरण निकम, राजू शिखरे, समाधान राक्षे, सिद्धनाथ शेडगे, चालक धनंजय जाधव यांनी शनिवारी दुपारी छापा टाकला. त्यानंतर पोलिस शकिला मुलाणी, समीर व अमीर मुलाणी यांना ताब्यात घेत असतानाच या दोघांनी पोलिसांना शिवीगाळ करीत दमदाटी केली.

शकिला या चौधरी यांच्या अंगावर धावून जात असतानाच समीरने चौधरी यांचा गळा आवळला. यावेळी आमीर व शकीला यांनीही चौधरी यांच्यावर हल्ला केला. यावेळी पोलिसांनी या सर्वांना हटवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे समीर व आमीर व शकीला आणि पोलिसांत झटापटी झाली. या झटापटीत शकीला व आमीर हे पसार झाले. या प्रकरणी रात्री उशिरा संतोष चौधरी यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती.