Sun, May 26, 2019 10:38होमपेज › Satara › चित्ररथाने कराड शिक्षण महोत्सवास प्रारंभ

चित्ररथाने कराड शिक्षण महोत्सवास प्रारंभ

Published On: Feb 27 2018 1:56AM | Last Updated: Feb 26 2018 10:45PMकराड : प्रतिनिधी 

कराड पंचायत समितीच्या वतीने 26 ते 28  फेबु्रवारी दरम्यान आयोजित शिक्षण महोत्सवास सोमवारी ग्रंथ दिंडी व शैक्षणिक चित्ररथाने उत्साहात प्रारंभ झाला. शिक्षण प्रसारासह विविध विषयांची उत्कृष्ट मांडणी करणारे चित्ररथ लक्षवेधी ठरले. विविध विषयांवरील आठ चित्ररथ सहभागी झाले होते. 

स्व. यशवंतराव चव्हाण समाधी स्थळापासून चित्ररथास प्रारंभ झाला. यावेळी पंचायत समितीचे सभापती सौ. शालन माळी, उपसभापती रमेश देशमुख, सदस्य रमेश चव्हाण, प्रणव ताटेे, गटविकास अधिकारी अविनाश  फडतरे, गटशिक्षण अधिकारी व्ही.एम. गायकवाड, विस्तार अधिकारी आनंद पळसे, जमिला मुलाणी, शिवाय निकम यांच्यासह सदस्य उपस्थित होते. 

हा चित्ररथ समाधीस्थळापासून मुख्य रस्त्याने चावडी चौक, आझाद चौक, दत्त चौकातून पंचायत समितीला वळसा घालून यशवंतराव चव्हाण बचतभवन येथील महोत्सवाच्या ठिकाणी आला. ग्रंथदिंडी व शैक्षणिक चित्ररथामध्ये विविध शाळांनी सहभाग घेतला होता.  उंडाळे बिट मधून छत्रपती शिवाजी महाराज यांचा जिवंत देखावा असणारा चित्ररथ होता. यामध्ये येवती, येळगाव, उंडाळे शाळेच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. 

मसूर बिट मधून अवकाशयान, वडगाव हवेली बिट मधून सर्व शिक्षा अभियानाचा चित्ररथ, सदाशिवगड बिट मधून कोपर्डे हवेली व बनवडी केंद्राचा स्वच्छतेकडून समृध्दीकडे या संत गाडगेबाबा यांचा जीवनपट दाखवणारा चित्रपट, विविध शासकीय योजनांची माहिती देणारा कोळे बिटमधील चित्ररथ, सुपने बिटचा वारकरी संप्रदाय, उंब्रज विभागातून सावित्रीबाई  फुले यांचा जिवंत देखावा असणारा चित्ररथ, काले बिटचा यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनावर आधारीत देखावा असणारा चित्ररथ सहभागी होता. 

संत परंपरेपासून अवकाश संशोधनापर्यंत सर्व प्रकारची माहिती देणारे हे चित्ररथ लक्षवेधी ठरले. ढोल, ताशा, लेझीम पथक यामुळे उत्साह होता.चोवीस केंद्रातील शिक्षक, विद्यार्थी ग्रंथदिंडीत सहभागी झाले होते.