Sat, Jul 20, 2019 11:29होमपेज › Satara › अल्पवयीन मुलीस पळवणार्‍या  आरोपीस २२ वर्षांनंतर अटक

अल्पवयीन मुलीस पळवणार्‍या  आरोपीस २२ वर्षांनंतर अटक

Published On: Aug 24 2018 12:48AM | Last Updated: Aug 23 2018 10:45PMदहिवडी : प्रतिनिधी

फूस लावून अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणातील आरोपीस पकडण्यात तब्बल बावीस वर्षांनंतर पोलिसांना यश आले. परंतु, पळवून नेलेली मुलीची कसलीही माहिती न मिळाल्याने या प्रकरणातील गुंतागुंत वाढली आहे. वावरहिरे (ता. माण) येथील विजय दादा खवळे याने 24 सप्टेंबर 1996 रोजी दुपारी तीन वाजता दहिवडी येथून एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले होते. त्यानंतर विजय खवळे याच्यावर दहिवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पण, आजपर्यंत या आरोपीचा तसेच त्या अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले नव्हते. पण सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक अमोल चांगण यांनी पुन्हा या प्रकरणाच्या तपासाला गती दिली. मागील तीन महिन्यांपासून कसून शोध घेतल्यावर विजय खवळे हा जांब (ता. इंदापूर, जि. पुणे) येथे राहत असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळाल्यावर पोलिस हवालदार महादेव राऊत व नाना भिसे, पोलिस नाईक अमोल चांगण व पोलिस कॉन्स्टेबल सागर अभंग यांनी सापळा रचून जांब येथून विजय खवळे यास ताब्यात घेतले.

विजय खवळे यास ताब्यात घेवून पोलिसांनी मोठे यश मिळवले असले तरी त्याने त्यावेळी पळवून नेलेली अल्पवयीन मुलगी त्याच्यासोबत आढळून आली नाही. त्यामुळे ती मुलगी सध्या कुठे आहे? त्या मुलीचे काय झाले? असे नवीन प्रश्‍न निर्माण झाले आहेत.