Fri, May 24, 2019 02:27होमपेज › Satara › वडिलांच्या खूनप्रकरणी मुलाला सक्‍तमजुरी 

वडिलांच्या खूनप्रकरणी मुलाला सक्‍तमजुरी 

Published On: Apr 22 2018 1:14AM | Last Updated: Apr 21 2018 10:14PMसातारा : प्रतिनिधी

कुर्‍हाडीने वार करून वडिलांचा खून केल्याप्रकरणी गोळेवाडी, ता. फलटण येथील सुहास सतीश उंबरे (वय 24) याला जिल्हा व सत्र न्यायालयाने 3 वर्षे सक्‍तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. 

दि. 1 मे 2016 रोजी दुपारी सतीश देवराज उंबरे (वय 62) हे मद्यपान करून आले होते. त्या नशेमध्येच पत्नी लता सतीश उंबरे (वय 45) यांना त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. मुलगा सुहास उंबरे याने ही मारहाण सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, नशेत असणार्‍या सतीश यांनी सुहासवरही कुर्‍हाडीने घाव घातला. यामध्ये त्याच्या हाताला जखम झाली.  याचा सुहासला राग आला यातूनच सुहासने वडील सतीश यांच्या डोक्यात कुर्‍हाड घालून त्यांचा खून केला. 

याप्रकरणी फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सहायक फौजदार एस. व्ही. लांडे यांनी केला होता. तपास पूर्ण करून त्यांनी दोषारोप पत्र दाखल केले होते. या गुन्ह्यात सरकारी पक्षाच्या वतीने अतिरिक्‍त सहायक जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. अजित कदम (साबळे) यांनी युक्‍तिवाद केला. या गुन्ह्यामध्ये एकूण 7 साक्षीदार तपासण्यात आले.  वैद्यकीय अधिकारी आणि परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे सुहास उंबरे याला दुसरे अतिरिक्‍त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. ए. ढोळकीया यांनी 3 वर्षांची शिक्षा सुनावली. 

या खटल्यात प्रॉसिक्युशन स्कॉडचे पोलिस उपनिरीक्षक पी. के. कबुले, हवालदार शमशुद्दीन शेख, संजय पाटील, सुनील सावंत, नंदा झांजुर्णे, कांचन बेंद्रे आणि अजित शिंदे यांनी सहकार्य केले. 

 

Tags : satara, satara news, crime, Father murder, son servitude,