Sat, Mar 23, 2019 18:19होमपेज › Satara › गिरवीत बाप-लेकीचा निर्घृण खून

गिरवीत बाप-लेकीचा निर्घृण खून

Published On: Sep 02 2018 1:18AM | Last Updated: Sep 01 2018 11:46PMफलटण : प्रतिनिधी

गिरवी (ता. फलटण) येथे शनिवारी चुलत भावानेच भाऊ व पुतणीवर धारदार कुर्‍हाडीने हल्‍ला करून खून केल्याची घटना घडल्याने तालुक्यासह जिल्हा हादरला आहे. किरण ऊर्फ पका भुजंगराव कदम (वय 32) व मुलगी कार्तिकी कदम (वय 3) असे खून झालेल्या दोघांची नावे आहेत. दरम्यान, या प्रकरणातील संशयित आकाश कदम (रा. गिरवी) याने पोलिसांसमोरच विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस तपास करत आहेत. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी : शनिवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास चाहूर नावाच्या शिवारातील शेतात जनावरांसाठी चारा घेण्यास आलेल्या किरण ऊर्फ पका भुजंगराव कदम (वय 33, रा. गिरवी) यांच्याशी  जुन्या वादातून संशयित आरोपी आकाश सदाशिव कदम (वय 20, रा. गिरवी) याने हातातील कुर्‍हाडीने त्यांच्या डोक्यावर व मानेवर वार करून त्यांचा खून केला. खून केल्यानंतर आकाशने मृतदेह घटनास्थळावरून फरफटत नेऊन लगतच्या कोरड्या विहिरीत टाकला. तसेच हा मृतदेह लोकांच्या नजरेस पडू नये यासाठी त्यावर गवतही टाकले.  संशयित आकाश कदम यानेे किरण कदम यांचा खून करून त्याची विल्हेवाट लावून तो परत येत असताना समोरच किरण यांची मुलगी कार्तिकी कदम दिसली. आपण केलेली हत्या कार्तिकीने पाहिली असेल, असा संशय त्याला आला.

त्यामुळे आकाशने तिचाही गळा आवळून निर्दयीपणे खून केला. तिचा मृतदेह त्याने पोत्यात घालून वडिलांच्या मृतदेहाशेजारीच फेकून दिला.  किरण कदम व कार्तिकी कदम हे दोघे बाप-लेक दिसत नसल्याने नातेवाईकांनी दोघांची शोधाशोध सुरु केली. मात्र, बराच वेळ त्यांचा शोध घेतल्यानंतरही थांगपत्ता लागत नसल्याने नातेवाईकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार यादव यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी परिसरात घातपात झाले असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. त्या अनुषंघाने तपासाची चक्रे गतीमान करून पोलिसांनी सर्वांची माहिती घेण्यास सुरूवात केली. यावेळी आकाश कदम याच्या हालचाली संशयास्पद आढळून आल्याने त्याला ताब्यात घेतले. संशयिताने प्राथमिक माहिती दिल्यानंतर पोलिसही हादरून गेले. वरिष्ठांना त्याबाबतची माहिती दिल्यानंतर संशयिताला ताब्यात घेण्यात आले. 

बाप-लेकीचा खून झाल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी विहिरीकडे धाव घेऊन पाहणी केली. त्या ठिकाणी माती उकरलेले दिसल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात आली. घटनास्थळाची पाहणी केली असता त्या ठिकाणी दोन मृतदेह सापडले. ते दोन्ही मृतदेह किरण व कार्तिकी कदम यांचे असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रूग्णालयात पाठवून दिले. तसेच संशयिताला बरोबर घेऊन जात असताना गाडीतच आकाशने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे या खून प्रकरणात आकाशचा सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले. यानंतर त्यालाही उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. 

ही घटना उघडकीस आल्यानंतर अतिरिक्त पोलीस अधिक्षक विजय पवार यांनी तातडीने फलटणला भेट देऊन तपासाबाबत अधिकार्‍यांना सूचना दिल्या. तर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. अभिजीत पाटील पोनि सजन हंकारे, प्रकाश सावंत व सहकार्‍यांनी घटनास्थळाला भेट देऊन इतर बाबींची माहिती घेतली.