होमपेज › Satara › तारळी नदीत पिता-पुत्र बुडाले

तारळी नदीत पिता-पुत्र बुडाले

Published On: Mar 21 2018 11:22PM | Last Updated: Mar 21 2018 11:22PM कराड : (सातारा)  प्रतिनिधी 

नदीत पोहण्यास शिकवत  असताना बुडणार्‍या मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात बापाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शिरगाव (ता. कराड) येथे घडली आहे. घटनेनंतर जवळपास 14 तासांनी बुधवारी सकाळी दुर्दैवी बापाचा मृतदेह नदीपात्रात मिळून आला. तर या घटनेत मुलगाही नदीत बुडाला असून बुधवार सायंकाळपर्यंत त्याचा शोध घेतला जात होता. प्रवीण श्रीरंग बाचल  (वय 38) आणि स्वप्निल प्रवीण बाचल (वय 10) अशी दुर्दैवी बाप-लेकांची नावे आहेत.

प्रवीण बाचल हे मुलगा स्वप्निल याला तारळी नदीत पोहणे शिकवत होते. मंगळवारी सायंकाळी ते नेहमीप्रमाणे स्वप्निल याला पोहण्यासाठी घेऊन नदीकडे गेले होते. स्वप्निल नदीत उतरून पोहत असतानाच अचानकपणे तो बुडू लागला. हे पाहून स्वप्निल याला वाचवण्यासाठी प्रवीण बाचल यांनी नदीत उडी घेत स्वप्निल याला वाचवण्याचा प्रयत्न केला; मात्र यावेळी स्वप्निलने भीतीपोटी प्रवीण बाचल यांना मिठी मारली आणि त्यामुळे ते दोघेही पाण्यात बुडाले.हा सर्व प्रकार एका ग्रामस्थाने पाहिला. त्यानंतर तो सायंकाळी सातच्या सुमारास गावात गेला आणि त्याने ही घटना ग्रामस्थांच्या कानावर घातली.

त्यानंतर रात्री उशिरापर्यंत बुडालेल्या बाचल पिता-पुत्राचा शोध घेतला जात होता. दरम्यान, रात्री नऊनंतर या घटनेची माहिती उंब्रज पोलिसांना देण्यात आली. घटनेचे गांभिर्य ओळखून ग्रामस्थांनी पोलिसांच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत शोधमोहिम राबवण्यात आली. मात्र, त्यास यश आले नाही. त्यामुळे बुधवारी सकाळी पुन्हा कराडमधील दरवेशी ग्रुप व अतीत येथील छावा ग्रुपमधील युवकांनी शोध मोहिम हाती घेतली. यावेळी काही ग्रामस्थही शोध मोहिमेत सहभागी झाले होते. सकाळी दहाच्या सुमारास प्रवीण बाचल यांचा मृतदेह शिरगाव पाणवठा परिसरात मिळून आला. त्यानंतर कायदेशीर सोपस्कर पूर्ण करत मृतदेह शवविच्छेदनासाठी कराडला पाठवण्यात आला होता. तर सायंकाळपर्यंत बुडालेल्या स्वप्नीलचा शोध सुरूच होता.

 

Tag : Drown, Father and son Died,  Tali River Stara