Wed, Jul 17, 2019 12:04होमपेज › Satara › शेतकरी पुन्हा जाणार संपावर 

शेतकरी पुन्हा जाणार संपावर 

Published On: Apr 14 2018 1:29AM | Last Updated: Apr 13 2018 10:22PMकराड : प्रतिनिधी

हमीभाव, कर्जमाफी या मुख्य प्रश्‍नासाठी देशभरातील 70 हून अधिक संघटनांनी एकत्र येऊन राष्ट्रीय किसान महासंघ स्थापन केला आहे. या महासंघाच्यावतीने एक जूनपासून देशव्यापी शेतकरी संपाची हाक देण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात याबाबत लवकरच नियोजन बैठक घेण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय किसान महासंघाच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले. 

या संपामध्ये पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, दिल्ली, राजस्थान, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू येथील शेतकरी सहभाग नोंदवणार आहेत. दरम्यान, मागण्या मान्य न झाल्यास 10 जूनला भारत बंदची हाक देण्यात येईल, अशी माहिती महासंघाचे निमंत्रक शिवकुमार शर्मा यांनी दिली.

महात्मा फुले जयंतीनिमित्त फुलेवाडा येथून अभिवादन करून किसान क्रांती जनआंदोलन व शेतकरी संघटनांची सुकाणू समितीची आत्मचिंतन बैठक झाली. यावेळी राष्ट्रीय किसान महासंघाचे निमंत्रक शिवकुमार शर्मा, शेतकरी संघटनेचे समन्वयक लक्ष्मण वंगे, सुकाणू समितीचे समन्वयक संजय पाटील-घाटणेकर, किसान क्रांती जन आंदोलनाचे समन्वयक सतीश कानवडे, राष्ट्रीय शेतकरी युनियनचे कार्याध्यक्ष संदीप गिड्डे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी डॉ. बुधाजीराव मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्राकरीता समन्वय समिती स्थापन करण्यात आली.

शर्मा म्हणाले, या संपात देशातील प्रमुख चाळीस शहरांचा दूध व भाजीपाला पुरवठा बंद केला जाणार आहे. सद्यस्थितीत सरकारचे शेतकरी विरोधी धोरण, व बाजारभाव, यामुळे देशातील शेतीउद्योग धोक्यात आला आहे. यासाठी एक जूनचा देशव्यापी संप करण्यात येणार आहे. 

कानवडे म्हणाले,  गेल्यावर्षी आंदोलनाच्या निमित्ताने सरकारने प्रश्‍न सोडविण्यासाठी समन्वयकांना आमंत्रित केले होते. त्यावेळी अल्पभूधारक शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करणे, बहुधारक व नियमित कर्जदार यांना विशिष्ट पॅकेज देणे, प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी चालना देणे, हमीभावासाठी कृषिमूल्य आयोगाची स्थापना करणे अशा मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या. प्रत्यक्षात कुठलीही कृती झाली नाही. 

घाटणेकर म्हणाले, शेतकर्‍यांच्या शेतीमालाचे  व दुधाचे नुकसान न करता शेतीमाल, दुधाला हमीभाव देण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये शेतकर्‍यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.  लक्ष्मण वंगे यांनी मनोगत व्यक्‍त केले. शंकर दरेकर यांनी प्रास्तविक केले. सूत्रसंचालन उमेश शिंदे तर आभार माधव पाटील यांनी मानले. 

 

Tags : satara, karad, karad news, Farmer, strike,