Fri, Jul 19, 2019 18:27होमपेज › Satara › सेंद्रिय शेतीकडे शेतकर्‍यांचा कल

सेंद्रिय शेतीकडे शेतकर्‍यांचा कल

Published On: Jun 11 2018 1:08AM | Last Updated: Jun 10 2018 9:04PMऔंध : वार्ताहर

रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या अतिवापराने कडधान्य, फळे आणि भाजीपाल्यां- मध्ये विषारी घटकांचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून येत आहे. अशा आहाराच्या सेवनाने कर्करोग, रक्तदाब, त्वचारोग तसेच विविध प्रकारचे पोटाचे विकार अशा घातक आजारांच्या विळख्यात सापडण्याची शक्यता बळकावल्यामुळे सेंद्रिय भाजीपाला, फळे, अन्नधान्य,  मध,  दूध यासारख्या आहाराच्या वापराकडे नागरिकांचा कल वाढला आहे. यामुळे सेंद्रिय कृषीमालाला चांगले दिवस येत असल्याचे चित्र आहे. 

सध्या सेंद्रिय उत्पादनांना 80 टक्के मागणी  असल्याची माहिती  आढळून आली आहे. ज्वारी, गहू, कडधान्ये, आले,भाजीपाला, मका, ऊस आदी नगदी पिकांचे उत्पादन  घेण्यात येते.  पीक  लवकर आणि टुमदार मिळावे यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात रासायनिक खत तसेच कीटकनाशकांचा उपयोग करतात. पण, असे अन्नधान्य आणि भाजीपाला शरिराला हानीकारक असल्याचे स्पष्ट होत आहे. याबरोबरच जमिनीचा पोत किंवा उत्पादन क्षमता कमी होताना दिसते. ही बाब शेतकर्‍यांच्या लक्षात आल्यानंतर रासायनिक खतांचा वापर कमी करुन शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळले असल्याचे दिसते. या शेती पध्दतीला कमी खर्च लागत असल्याने शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जात नव्हता. आता मात्र जास्त उत्पादन घेण्याच्या प्रयत्नात शेतकरी रासायनिक घटकांचा भडीमार पिकांवर करत असल्याने अन्नसाखळीच बिघडण्याची वेळ आली आहे.

सेंद्रिय उत्पादन घेणार्‍या शेतकर्‍यांनी कृषीमाल थेट बाजारपेठेत विक्रीस उपलब्ध करुन देण्याची गरज आहे. यातून  त्यांना समाधानकारक आर्थिक लाभही होईल आणि ग्राहकांना उत्तम भाजीपाला अथवा फळेही मिळणे शक्य होईल. 

किडनाशक औषधे कृत्रिमरित्या बनवलेली असतात. त्यांचे जैविक विघटन होते. मात्र, निसर्गात विलीन होत नाहीत. त्यांचे विघटन होऊन दुसरेच विषारी घटक तयार होतात, जे सजीवांना घातक ठरतात. कोणतेही रासायनिक औषध पिकावर फवारल्यानंतर त्याचा प्रभाव 8-10 दिवस राहून त्याचे इतर घटकात विघटन होते. त्याच्या विघटनातून निर्माण होणारे घटक कर्करोगासारख्या जीवघेण्या रोगाला आमंत्रण देतात. यावर विचार होण्याची आज गरज आहे. 

गोपालनास शासनानेच महत्त्व द्यावे

सेंद्रिय शेतीचे प्रमाण व महत्त्व वाढविण्यासाठी गोपालन,पशूपालनास मोठ्या प्रमाणात पाठबळ देणे आवश्यक आहे. शेणखताचा वापर वाढवून पिकांवर रासायनिक औषधांचा वापर कमी करणे गरजेचे आहे. वेगवेगळ्या आजारांचे मूळ हे अन्नधान्य तसेच भाजीपाल्यावर फवारल्या  जाणार्‍या औषधामध्ये असल्याने अनेकांनी असा आहार बंद करण्यावर भर दिला आहे. शहरातील हे लोण आता ग्रामीण भागात पसरु लागले असून अनेकांनी छोटेखानी सेंद्रिय शेती करायला सुरुवात केली आहे.  त्यास व्यापक स्वरूप देण्याची गरज आज निर्माण झाली आहे.