Mon, May 27, 2019 08:42होमपेज › Satara › ‘फलटण शुगर’वर शेतकर्‍यांचा मोर्चा

‘फलटण शुगर’वर शेतकर्‍यांचा मोर्चा

Published On: Mar 21 2018 11:22PM | Last Updated: Mar 21 2018 10:59PM फलटण : प्रतिनिधी
थकीत पगार व चालू हंगामातील उसाचे पैसे न मिळाल्याने बुधवारी दुपारी साखरवाडी येथील न्यू फलटण शुगर वर्क्स या कारखान्यावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी सहभागी झाले. या मोर्चात करण्यात आलेल्या बहुतांश मागण्या पूर्ण करण्याचे आश्‍वासन कारखाना प्रशासनाने  मोर्चेकर्‍यांना दिले. साखरवाडी बसस्थानकापासून ताशा व हलगीच्या आवाजात मोर्चाला सुरूवात झाली. मोर्चा बाजारपेठेमधून  कारखाना कार्यालयाजवळ आला. मोर्चा कारखाना परिसरात आल्यानंतर पोलिसांनी मोर्चाला अटकाव केला.

यावेळी निवेदन घेण्यासाठी कारखाना प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी बाहेर यावे, अशी मागणी केली. यावेळी संचालक शामराव भोसले, धनंजय साळुंखे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, तालुकाध्यक्ष नितीन यादव, सचिन खानविलकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत कारखान्याने शेतकर्‍यांचे थकवलेले 32 कोटी रूपये 31 मार्चपूर्वी अदा करावे, असे सांगण्यात आले. 
त्यानंतर संचालक साळुंखे यांनी कारखाना अडचणीत सापडला आहे. शेतकर्‍यांची थकबाकी देण्यास आम्ही कटिबध्द आहोत. मात्र, 31 मार्चपूर्वी ही रक्‍कम देण्यास असमर्थ असल्याचे सांगितले. त्यामुळे चर्चा फिस्कटल्याने एकच गोंधळ उडाला. त्यानंतर काही वेळाने ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोनि अशोक शेळके यांनी मध्यस्थी करत दोन्ही बाजूच्या पदाधिकार्‍यांची पुन्हा बैठक लावली. यावेळी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी माघार घेत ठरल्याप्रमाणे प्रति टन 2 हजार 650 रूपये दोन टप्प्यात द्यावे, अशी मागणी केली. त्यावर कारखाना प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर 18 एप्रिलपर्यंत सर्व पैसे दिले जातील, असे आश्‍वासन दिले. यानंतर मोर्चा स्थगित करण्यात आला.


शेतकर्‍यांचे पैसे देण्यास कटिबद्ध 
 
साखर व्यवसायात सद्यस्थितीत निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे ऊसाचे पेमेंट करण्यास विलंब होत आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत ऊस उत्पादक शेतकर्‍यांना 2650 रुपये प्रतिटन प्रमाणे संपूर्ण पेमेंट देणार असल्याचे न्यू फलटण शुगर वर्क्सचे चेअरमन प्रल्हादराव साळुंखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.  साळुंखे म्हणाले, सलग तीन हंगामात प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्याने साखर व्यवसाय संकटात सापडला आहे. साखरेचे दर खाली आल्याने कारखान्याला 35 ते 40 कोटींचा तोटा झाला आहे. कारखाना संकटात सापडल्याने केंद्र शासनाने एक्साईज व सॉफ्ट लोन मिळाले नाही. तसेच एफआरपी प्रमाणेच पेमेंट द्यावे लागल्याने तोटा झाला. 

यंदाच्या गळीत हंगामात 2 लाख 90 हजार मे टन उसाचे गाळप होऊन 3 लाख साखर पोत्यांचे उत्पादन झाले. यावेळी 10 कोटी रूपये उचल, 3 कोटी 39 लाख भविष्य निर्वाह निधी, 7 कोटी 25 लाख एक्साईज पेनल्टी झाल्याने आर्थिक अडचणी वाढल्या. दरम्यान, या वर्षीच्या गळीत हंगामात गाळपास आलेल्या ऊसाला प्रतिटन 2650 रुपये देण्याची घोषणा केल्याने त्यामध्ये कोणताही बदल न करता पहिल्या हफ्त्याचे 2650 रुपये देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आउटसोर्सिंगद्वारे 85 कोटी रुपये उपलब्ध होण्यासाठी करार झाले असून त्यामध्ये काही तांत्रिक बाबी निर्माण झाल्याने सदरची रक्कम मिळण्यास विलंब झाला आहे.  तथापी कोणत्याही परिस्थितीत शेतकर्‍यांना उसाचे पेमेंट आणि कामगारांना त्यांचे पगार दिले जातील, अशी ग्वाही साळुंखे यांनी दिली. 

गत 10 वर्षातही आपण ऊस पेमेंट आणि कामगार पगार दिले नाहीत. असे घडले नाही कदाचीत विलंब झाला असेल मात्र दिले नाही असे घडले नाही यापुढेही घडणार नाही. ऊस उत्पादकांचे नावाने पेमेंटसाठी आंदोलन उभारणार्‍या शामराव भोसले यांच्यावरही संचालक या नात्याने सदरचे पेमेंट करण्याची जबाबदारी आहे. मात्र, ती टाळून ते शेतकर्‍यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही साळुंखे यांनी केला. ज्यांनी स्वत:च्या ऊसाचे पूर्ण पेमेंट घेतले त्यांनीच आंदोलनाचे नेतृत्व करणे कितपत योग्य आहे? असा सवालही साळुंखे पाटील यांनी केला. 

दरम्यान, कारखाना टेक ओव्हर करुन ऊस उत्पादक शेतकरी व कामगारांना दिलासा देण्यासाठी खा. शरद पवार व अन्य  मान्यवरांच्या माध्यमातून प्रयत्नशील आहोत. त्यातूनही समाधानकारक तोडगा काढला जाईल. शेतकर्‍यांनी आतापर्यंत ठेवलेला विश्‍वास कायम ठेवावा. त्या विश्‍वासाला कोठेही तडा जाऊ न देता, शेतकरी व कामगारांच्या हिताला बाधा येवू न देता  आपण आतापर्यंत काम केले आहे. या पुढेही त्यामध्ये मागे राहणार नसल्याची ग्वाही साळुंखे पाटील यांनी दिली.
 

Tag : Farmers' Protest  Sugar Phaltan In Satara District