Tue, Aug 20, 2019 04:30होमपेज › Satara › जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकर्‍याकडून विषप्राशन

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकर्‍याकडून विषप्राशन

Published On: Apr 27 2018 1:09AM | Last Updated: Apr 26 2018 10:38PMसातारा : प्रतिनिधी

सातारा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गुरुवारी दुपारी सुनील संपत मोरे (वय 35 रा. तारगाव) या युवा शेतकर्‍याने विषप्राशन केल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर नायब तहसीलदारांसह तलाठ्याने त्यांना उपचारासाठी सातारा सिव्हिल येथे दाखल केले. मात्र, प्रकृती अत्यवस्थ बनल्याने पुढील उपचारासाठी त्यांना पुणे येथे हलवण्यात आले आहे. दरम्यान, जमीन वहिवाटीसाठी जागा मिळत नसल्याच्या कारणातून त्यांनी विष पिले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, सुनील मोरे यांची सुमारे एक एकर जमीन आहे. मात्र, रस्ता वहिवाट करण्यासाठी जागा मिळत नसल्याने ते त्रस्त होते. याप्रकरणी वेळोवेळी त्यांनी अर्जही केले होता. मात्र, तरीही न्याय मिळत नसल्याने ते पाठपुरावा करत होते. गुरुवारी याच कामाच्या निमित्ताने ते सातारा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आले होते. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातच त्यांनी विषारी औषध प्राशन केले.

या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमू लागल्यानंतर नायब तहसीलदार व तलाठी यांनी तहसीलदारांच्या वाहनातून सुनील मोरे यांना सातारा जिल्हा शासकीय रुग्णालय दाखल केले. डॉक्टरांनी तत्काळ उपचाराला सुरुवात करुन त्यांना अतिदक्षता विभागात ठेवले. प्रकृती नाजूक होत चालल्याने अखेर पुढील उपचारासाठी त्यांना सायंकाळी पुणे येथे हलवण्यात आले.
दरम्यान, आठ दिवसांपूर्वी सातारा जिल्हा पोलिस मुख्यालयासमोर एकाने विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आता लगेचच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात शेतकर्‍याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. सुनील मोरे यांच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. रात्री उशीरापर्यंत या घटनेची नोंद झालेली नव्हती.