Sun, May 19, 2019 22:45होमपेज › Satara › शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीचे अन्नत्याग आंदोलन

शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीचे अन्नत्याग आंदोलन

Published On: Mar 20 2018 1:50AM | Last Updated: Mar 19 2018 11:05PMसातारा : प्रतिनिधी

राज्य सरकारने दिलेली आश्‍वासने पाळली नाहीत त्यामुळे या सरकारचा निषेध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी शेतकरी संघटनांच्या सूकाणू समितीच्यावतीने अन्‍नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन करण्यात आले.

शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित 50 टक्के अधिक हमीभाव द्यावा, दूध उत्पादक शेतकर्‍यांना न्याय द्या, शेतकरी आंदोलनाच्या काळातील  गुन्हे मागे घेण्यात यावेत  यासह अन्य मागण्या मंजूर करूनही शासनाने दिलेली आश्‍वासने अद्याप अपूर्ण असून ती वेळेत पूर्ण करावीत, यासाठी सुकाणू  समितीतर्फे अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. शेतकर्‍यांच्या संपानंतर शासनाने सुकाणू समितीला लेखी आश्‍वासने दिली होती.

गेल्या आठवड्यात किसान सभेेने काढलेल्या लॉगमार्चनंतर सरकारला  जाग आली. पुन्हा लेखी आश्‍वासने देण्यात आली मात्र, ही आश्‍वासने पाळली जावीत, यासाठी सुकाणू समितीची मुंबईत बैठक झाली. यामध्ये राज्यव्यापी आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला. 19 मार्च 1986 ला यवतमाळ येथे साहेबराव करपे या शेतकर्‍याने कर्जबाजारीपणामुळे कुटुंबासह आत्महत्या केली होती म्हणून करपे कटुंबियांना  अभिवादन करण्यासाठी अन्नत्याग सत्याग्रह करण्यात आला असल्याचे  जिल्हाध्यक्ष विकास जाधव यांनी सांगितले.

दरम्यान, दि. 23 मार्च ते 27 एप्रिलपर्यंत राज्यभर हुतात्मा अभिवादन शेतकरी जागर यात्रा काढून स्वातंत्र्य लढ्यापासून ते आजपर्यंत विविध लढ्यात हुतात्मा झालेल्यांना  अभिवादन करण्यात येणार आहे.राज्यात 540 सभा घेवून ही यात्रा 27 एप्रिलला पुणे येथील महात्मा फुले  वाड्यात पोहोचणार आहे. महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 30 एप्रिल  रोजी राज्यभर शेतकरी, शेतमजूर कायदेभंग करून स्वत:ला अटक करवून घेणार आहेत. आंदोलनात  साजिक मुल्ला, शिवाजी काळे, प्रकाश फडतरे, राजेंद्र बर्गे व शेतकरी सहभागी झाले आहेत.

 

Tags : satara, satara news, farmer, sukanu samiti, agitation,