Wed, Apr 24, 2019 07:34होमपेज › Satara › 'दैनिक पुढारी'ने वास्तव समोर आणले : पृथ्वीराज चव्हाण (Video)

'दैनिक पुढारी'ने वास्तव समोर आणले : पृथ्वीराज चव्हाण (Video)

Published On: May 05 2018 5:57PM | Last Updated: May 05 2018 5:57PM कराड :  प्रतिनिधी 

'दैनिक पुढारी'च्या सर्व्हेतून राज्यातील वास्तव समोर आले आहे. निवडणुकीला दीड वर्षाचा अवधी असतानाही 61 टक्के लोक सरकारच्या कामगिरीवर नाराज आहेत. नोटाबंदी, जीएसटी, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी यासारख्या मुद्द्यांवर सरकार अपयशी ठरले आहे. मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असताना लोकांची खूप लोकप्रियता मिळते. पण, असे असूनही मुख्यमंत्र्यांची लोकप्रियता घटल्याचे बोलके चित्रही या सर्व्हेतून समोर आल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री  पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

दैनिक 'पुढारी'ने घेतलेल्या राज्यव्यापी 'महासर्वेक्षण'च्या पार्श्वभूमीवर बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, चुकीचे निर्णय आणि निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांकडे दुर्लक्ष यामुळे राज्यातील लोक भाजपा सरकारवर नाराज आहेत. पंतप्रधान हे देशाचे असतात, पण नरेंद्र मोदी हे कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी नगरपालिका, ग्रामपंचायतीसारखे गल्लीगल्लीत सभा घेऊन देशाचे भवितव्य, देशाचा विकास यासारख्या मुद्द्यावर बोलण्याचे टाळत आहेत. भाजपा सरकारने लोकांना दिलेली आश्वासने पाळलीच नाहीत. त्यामुळे पंतप्रधानांसह भाजपा आता लोकांना आणखी आश्वासने देऊच शकणार नाही. पुढील निवडणूक जाहीरनाम्यावर होणार नाही, असे सांगत चव्हाण यांनी राज्यातील आणि केंद्रातील भाजपा सरकार घालवणे हेच आमचे ध्येय असल्याचे सांगितले. 

त्यासाठी राज्यात कॉंग्रेसेच नेतृत्व कोण  करेल? हा मुद्दा आमच्यासाठी गौण आहे. तसेच आपण सध्यस्थितीत केवळ आमदार म्हणून कार्यरत आहे. विरोधी पक्षनेतेपद अथवा अन्य कोणतेही पद नसताना लोकांचे जे प्रश्न समोर येतील, त्याविरोधात आपण आवाज उठवण्याचे काम करतो. मात्र त्यानंतरही मुख्यमंत्री पदासाठी 11 टक्के जनतेने पाठिंबा दिल्याबद्दलही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जनतेचे आभार मानले आहेत.