Wed, Jun 26, 2019 18:24होमपेज › Satara › सन्मानाने भारावली हुतात्म्यांची कुटुंबे

सन्मानाने भारावली हुतात्म्यांची कुटुंबे

Published On: May 01 2018 1:17AM | Last Updated: Apr 30 2018 11:51PMसातारा : प्रतिनिधी

पश्‍चिम महाराष्ट्रातील हुतात्मा जवानांच्या वीर पत्नी, वीर माता, वीर पिता यांच्या अनोख्या सन्मान सोहळ्याने सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सभागृह सद‍्गदित झाले. हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांचे हुंदके, डोळ्यातून अखंड वाहणार्‍या अश्रूंच्या धारा अन् त्यांना उपस्थितांकडून मिळालेली सलामी अशा भावूक वातावरणाने आख्खे सभागृह भावनाविवश झाले.  सन्मानाने हुतात्म्यांची कुटुंबेही भारावून गेली. कृतज्ञता निधी देवून ‘जयहिंद’ फौंडेशनने शहिदांना अनोखी सलामी दिली.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी  बँकेच्या स्व. यशवंतराव  चव्हाण सभागृहात जयहिंद फौंडेशनच्यावतीने हुतात्मा सैनिक परिवार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात हुतात्मा जवानांच्या कुटूंबांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सैन्यदल, केंद्रीय सुरक्षा दल, सीमा सुरक्षा दलातील पश्‍चिम महाराष्ट्रातील 13 हुतात्मा सैनिक परिवारांच्या वीर माता-पिता, वीर पत्नी यांचा सन्मानचिन्ह, 21 हजार रुपयांचा धनादेश व साडी-चोळी देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

व्यासपीठावर निवृत्त ले.जनरल व्यंकटेश माधव पाटील, ख्यातनाम वक्‍ते व विचारवंत प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, दै.‘पुढारी’चे वृत्त संपादक व सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे, निवृत्त कमांडर शिवाजी तरटे, राजेंद्र शिंदे, अभिनेत्री श्‍वेता शिंदे, ‘लागीर झालं जी’चे लेखक तेजपाल वाघ, मेजर प्रतापराव भोसले, भाऊसाहेब शिंगाडे, निनादशेठ शिंगाडे, फाऊंडेशनचे अध्यक्ष संदीप माने, खजिनदार रविंद्र भोसले, चंद्रशेखर चोरगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होेते.

डॉ. यशवंत पाटणे म्हणाले, जयहिंद फौंडेशनने हुतात्मा सैनिक परिवार सन्मान सोहळ्यातून आपले श्रेष्ठत्व सिध्द केले आहे. हे फौंडेशन  खर्‍या अर्थाने मानवतेचे मंदिर आहे. हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांच्या पाठीमागे ताकदीने उभे राहिले आहे. फौंडेशनच्या या अनोेख्या कार्याचे या कार्यक्रमातून अंतरिक तळमळ व भावनिक गुंतवणूक निर्माण केली आहे. हुतात्म्यांच्या रक्ताचे राजकारण नको तर त्यांच्या त्यागाचे स्मरण करावे.  त्यामुळे इतिहास हा त्यांनी केलेल्या त्यागाचा असतो. या सोहळ्यातून हुतात्मा जवान व त्यांच्या कुटूंबाप्रती मायेचा ओलावा निर्माण करून  मानवतेला स्पर्श केला आहे.

हरीष पाटणे म्हणाले, सातारा जिल्हा सैनिकांचा जिल्हा आहे. सातारा जिल्ह्यातील सैनिकांनीच देशाचे व सीमेचे संरक्षण केले आहे. जवानांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जयहिंद फौंडेशन  गेली अनेक वर्ष काम करते ते निश्‍चितच कौतुकास्पद आहे. या कार्याला कृतीतून सदिच्छा दिल्या पाहिजेत. केवळ उपस्थिती न दाखवता फौैंडेशनने दिलेली जबाबदारी पार करून काम केले पाहिजे. तरच ही फौंडेशनला व जवानांच्या कुटूंबियांना खरी मदत ठरेल. 

श्‍वेता शिंदे म्हणाल्या, देशसेवा करणार्‍या सैनिकांची प्रेरणा घेऊन ‘लागीर झालं जी’ ही मालिका तयार करण्यात आली आहे.  या मालिकेसाठी दिवस-रात्र टीमने मेहनत घेतली. सैनिकांचे आयुष्य सामान्यांपर्यंत पोहचवण्याचा हा एक प्रयत्न आहे. त्यासाठी तुम्हा सर्वांची साथ पाहिजे. तेजपाल वाघ म्हणाले, लागीर झालं जी ही आर्मीवर असणारी एकमेव मालिका आहे. खरा जवान कसा घडतो हे या मालिकेत दाखवण्यात आले आहे. यावेळी प्रतापराव भोसले, व्यंकटेश पाटील, शिवाजी तरटे यांनी मनोगत व्यक्‍त केले. हिंदूराव ननावरे यांनी कवितेचे वाचन केले. सचिव हणमंत मांढरे यांनी प्रास्तविक केले.

Tags : Satara, Families, honored, martyrs