होमपेज › Satara › बनावट नोटांचा कन्स्ट्रक्शनसाठी वापर?

बनावट नोटांचा कन्स्ट्रक्शनसाठी वापर?

Published On: Jun 15 2018 1:07AM | Last Updated: Jun 14 2018 10:14PMसातारा : विठ्ठल हेंद्रे

एलसीबीने सातार्‍यातील सहा जणांच्या टोळीची पोलखोल करुन बनावट 57 लाख रुपये जप्‍त केलेल्या कारवाईतील गणेश भोंडवे (मूळ रा.काशिळ) हा अट्टल गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली असून अन्य संशयित उच्चशिक्षित असल्याची धक्‍कादायक माहिती आहे. दरम्यान, बनावट नोटांच्या माध्यमातून रिअल इस्टेट, कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये हा पैसा वापरणार असल्याचीही खळबळजनक माहिती  समोर आली आहे. यामुळे संशयितानी  आतापर्यंत ‘व्हाईट’ केलेला पैसा कुठे कुठे वापरला आहे? हे तपासणे गरजेचे बनले आहे.

सातारा एलसीबीच्या पथकाने बुधवारी दिवसभरात शहरात ठिकठिकाणी छापे टाकून 57 लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्‍त केल्या आहेत. आर्थिक व्यवस्था खिळखिळीत करणाचा हा प्रयत्न झाल्याने संवेदनशील विषय बनला आहे. बनावट नोटाप्रकरणात आतापर्यंत सहा जणांची टोळी असल्याचे समोर आले आहे. यातील मुख्य सूत्रधार हा गणेश भोंडवे असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. भोंडवे हा सराईत गुन्हेगार आहेे. गेल्या सात वर्षामध्ये त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामध्ये लुटमार, जबरी चोरी व पिस्टल प्रकरणातही त्याचे नाव रेकॉर्डला आलेले आहे. गणेश भोंडवे गेल्या काही वर्षांपासून मोळाचा ओढा परिसरात रहात आहे.

मोळाचा ओढा परिसरात राहत असताना गणेश भोंडवे व सुनील राठोड याची ओळख झाली. सुनीलची अमेय, राहुल, अमोल, अनिकेत यांच्याशी मैत्री आहेे. राहुल, अमेयसह इतर बाकीचे संशयित उच्चशिक्षित आहेत. सिव्हील इंजिनिअरसह वेब डिझायनिंगचे शिक्षणही काही जणांचे झाले आहे. गणेश भोंडवे या ग्रुपमध्ये आल्यानंतर त्याने इतरांचे ‘टॅलेंट’ ओळखले. मित्रांची ही मोळी ‘कामाची चीज’ असल्याचे हेरुन त्याने ‘गळ’ टाकण्यास सुरुवात केली. उच्चशिक्षित युवकांना कन्स्ट्रक्शन व्यवसायात यायचे होते. तसेच त्यासाठी लाखो रुपयांची गुंतवणूक करायची असल्याने पैशांची नितांत गरज होती.

दरम्यान, यातील काही जणांची कन्स्ट्रक्शनची कामे सुरु असून काही ठिकाणी कामेही पूर्ण झाली असल्याची चर्चा आहे. रिअल इस्टेट, कन्स्ट्रक्शन व्यवसायात पैसा गुंतवावा लागणार असल्याने गणेशने तो सर्व पैसा उभा करुन देण्याची तयारी गणेशने बोलून दाखवली. ‘तुम्हाला हवे तेवढे पैसे देतो. आपण बनावट पैसे छापूया. बनावट पैसा टप्प्याटप्प्याने खपवल्यानंतर आपआपले मार्ग वेगळे असतील’, असा तीर गणेशने मारला.

सुरुवातीला नाही नाही म्हणता अखेर बनावट नोटा छापण्यासाठी सर्वांचे एकमत झाले. बनावट नोटा छापण्यासाठी साहित्याची यादी तयार काढल्यानंतर गणेश भोंडवे यानेच ते सर्व साहित्य उपलब्ध करतो, असे सांगून प्रिंटर, स्कॅनर, संगणक, कागद अशा सर्व वस्तू आणल्या. बनावट नोटा छापण्यासाठी निवांत जागी खोलीची आवश्यकता असल्याने महामार्गावर डी मार्टच्या पाठीमागे असणार्‍या मातोश्री पार्कमध्ये एक खोली घेण्यात आली. याठिकाणी बनावट नोटा छपाई सुरु असताना काही कालावधी गेल्यानंतर कोणाला संशय  येवू नये यासाठी खोली बदलण्याचा निर्णय घेण्यात आला.

शुक्रवार पेठेतील गणेश अपार्टमेंटमध्ये एक खोली मिळाल्यानंतर त्याठिकाणी पुन्हा 2 हजार व 500 रुपयांच्या बनावट नोटा छापण्यास सुरुवात करण्यात आली. गेल्या अनेक महिन्यांपासून या टोळीने बनावट नोटा छापल्याचे समोर आल्याने त्या बाजारात किती वितरीत केल्या आहेत हे पुढील तपासातच समोर येणार आहे. आता या प्रकरणाचा पुढील तपास शाहूपुरी पोलिस करणार आहेत. सर्व संशयितांचा ताबा या पोलिसांकडे असल्याने आता पोलिस पुढील तपास कसा करणार? या साखळीत आणखी कोणाचा समावेश आहे का? पोलिस कोठडीत कोणती वेगळी माहिती समोर येणार? याअगोदर बिल्डींग व्यवसायासाठी हा पैसा वापरला गेला आहे का? हे येत्या काही दिवसांत समोर येणार आहे.

एकाच सिरीजचे लाखो रुपये..

बनावट छापणे हे मुळातच कौशल्याचे काम. मात्र अथक कौशल्य वापरल्यानंतरही बनावट नोटा छापताना या टोळीला अडचणींना सामोरे जावे लागले आहे. बनावट छापल्या जाणार्‍या प्रत्येक नोटेला वेगळा नंबर देणे अशक्यप्राय असल्याचे समोर आले. मात्र यावर उतारा म्हणून एकाच सिरीजच्या पाचशे ते एक हजार नोटा छापायच्या असे ठरले. नोटा वितरीत करताना एकाच सिरीजमधील नोटा एकत्र दिल्या जाणार नाहीत याची काळजी घेण्याचे सर्वांनी ठरवले. पोलिसांनी सर्व नोटा पाहिल्यानंतर पंचनामा करत असताना ही बाब निदर्शनास आली.