होमपेज › Satara › बनावट मोबाईल टोळीचा ‘बेलदार ब्रँड’

बनावट मोबाईल टोळीचा ‘बेलदार ब्रँड’

Published On: Mar 16 2018 1:21AM | Last Updated: Mar 15 2018 8:26PMसातारा : विठ्ठल हेंद्रे

सातारा पोलिसांनी बुधवारी बनावट मोबाईलचा पर्दाफाश केल्यानंतर या पाठीमागे उच्च शिक्षित टोळी कार्यरत असल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. बनावट मोबाईलची पाळेमुळे महाराष्ट्रासह इतर राज्यात असण्याची शक्यता असून त्यातून कोट्यवधी रुपयांची फसवणूक होत आहे. बनावट मोबाईल वरवर ओरिजनल वाटतो मात्र आतील बॉडी पूर्णपणे डुप्लीकेट बनवली गेली आहे. दरम्यान, बनावट मोबाईल बहाद्दरांनी मोबाईल फंक्शनमध्येच ‘बेलदार’ ब्रँड केला असल्याचे उघडकीस आले आहे.

बनावट मोबाईलप्रकरणी सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषन विभाग व सायबर क्राईम विभागाने बुधवारी मोठी कारवाई केली. याप्रकरणी अटक केलेला कन्हैय्यालाल बेलदार हा युवक 24 वर्षाचा आहे. कैन्हैय्यालाल हा बारावीपर्यंत विज्ञान शाखेतून शिकला असून त्यानंतर त्याने पदवीचे शिक्षणही पूर्ण केले. धक्‍कादायक बाब म्हणजे तो सध्या पोलिस भरतीचा सरावही करत होता. घरची परिस्थिती हालाखीची असल्याने त्याला पैशांची गरज होती. यातच तो  वाईट मित्रांच्या संगतीमध्ये आला. यातूनच एक मोबाईल विक्री केल्यानंतर त्यातून दोन ते तीन हजार रुपयांचे कमिशन मिळत असल्याने त्याने मित्र देत असलेले मोबाईल विक्री करण्याचा सपाटाच लावला.

कैन्हय्यालाल बनावट मोबाईल विक्री करण्यासाठी सातारापर्यंत आला. पैशाची गरज असल्याचे खोटे नाटे सांगून बनावट मोबाईल विकलाही. तक्रारदाराने मात्र सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर सायबर क्राईम पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. गेले दोन महिने सातारा पोलिस या घटनेचा तपास करत असताना मोबाईल विक्री करणार्‍यापर्यंत पोहचले व त्याला अटक केली. पोलिसांनी संशयिताकडे प्राथमिक चौकशी केल्यानंतर मोबाईल बनावट प्रकरणाचा महाराष्ट्रातील हा मोठा प्रकार असल्याचे समोर आले.

बनावट मोबाईल करणार्‍या टोळीने स्वत:च्या आडनावाचा ब्रँडही मोबाईलमध्ये समाविष्ट केला आहे. मोबाईल स्वीच ऑफ किंवा स्वीच ऑन केल्यानंतर लगेचच ‘बेलदार’ अशी इंग्रजीमध्ये अक्षरे येत आहेत. धक्‍कादायक बाब म्हणजे बनावट मोबाईल स्वीच ऑफ किंवा स्वीच ऑन केल्यानंतर सुरुवातीला कंपनीच्या नावाचा उल्‍लेख कधी होतो तर कधी होतही नसल्याची माहिती समोर आली आहे.

मोबाईलचे आतील सर्किट खेळण्यातले..

मोबाईल बनावट करणार्‍यांनी एकप्रकारे नवीन शोधच लावलेला आहे. अ‍ॅन्ड्राईड मोबाईल बिल्टअप असल्याने ते खोलले जात नाहीत, हे सर्वश्रुत आहे. याचाच या टोळीने गैरफायदा घेतला आहे. बनावट मोबाईलचा वरील सांगाडा हा हुबेहुब त्या त्या कंपनीच्या हँण्डसेट सारखाच दिसतो. मोबाईल विकत घेणारा फारतर कॅमेरा, व्हिडीओ व इतर फंक्शन पाहतो. कमी किंमतीला मोबाईल मिळत असल्याने तो मोबाईल विकत घेतो. असाच प्रकार सातारामध्ये झाल्यानंतर सायबर क्राईमच्या पोलिसांनी बनावट मोबाईल ऑपरेशन केल्यानंतर मोबाईलचे आतील सर्कि ट पाहून ते चक्रावून गेले. खेळण्यातला जसा मोबाईल असतो तसेच हुबेहुब आतील फंक्शन असल्याचे निघाले. बनावट मोबाईलची बॅटरी छोटी असून तिला छोट्या वायरने चालू राहण्यासाठी सर्कीटला जोडलेले आहेे. सर्वसामान्य दुकानात असणार्‍या छोट्या बॅटरीच्या माध्यमातून मोबाईलची बॅटरी बनवण्यात आली आहे.

टोळीकडे मोबाईलच्या बनावट पावत्या..

संशयितांकडे बहुतेक कंपन्यांचे बनावट मोबाईल असून मोबाईल पाहिल्यानंतर तो नवाकोरा असल्यासारखा असतो. एका एकाकडे किमान दोन ते तीन मोबाईल विक्रीसाठी असतात. मोबाईल पाहताच तो बनावट असेल असे भल्या भल्यांनाही वाटणार नाही. अगदीच शंका आली तर विक्री करणारा मोबाईलची पावती असल्याचेही दाखवतो. यामुळे मोबाईल बनावट असण्याची शंका पुढच्या व्यक्‍तीला येत नाही. धक्‍कादायक बाब म्हणजे या टोळीकडे मोबाईलच्या असणार्‍या पावत्याही बोगस, बनावट असल्याचे समोर आले आहे.

डोकेबाजांची बनावट मोबाईल टोळी..

बनावट मोबाईल टोळीमध्ये उच्च शिक्षित युवक असण्याची शक्यता आहे. मोबाईल तयार करण्याची ‘लॅब’ असण्याची शक्यता असून त्यासाठी लागणारे साहित्य हे बाजारपेठातून ठिकठिकाणाहून घेतले जात आहे. एक बनावट मोबाईल तयार करण्यासाठी या टोळीला अवघा तीन ते चार हजार रुपयांचा खर्च येत असल्याची माहिती आहे. बनावट मोबाईल विकताना मात्र तो आठ ते दहा हजार रुपयांपासून पुढे विकला जात आहेे. यामुळे एका मोबाईलमधून त्यांना दुप्पट, तिप्पट रक्‍कम मिळत आहे. अशाप्रकारे एका डोकेबाजाने आतापर्यंत 50 ते 100 हून अधिक बनावट मोबाईल विकल्याची शक्यता व्यक्‍त केली जात आहे.