होमपेज › Satara › जिल्हा बँकेची नेले शाखा फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न

जिल्हा बँकेची नेले शाखा फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न

Published On: Jul 10 2018 1:04AM | Last Updated: Jul 09 2018 11:19PMसातारा : प्रतिनिधी

सातारा जिल्हा मध्यवर्ती (डीसीसी) बँकेची नेले, ता. सातारा येथील शाखा अज्ञात चोरट्यांकडून सोमवारी पहाटे फोडण्याचा प्रयत्न झाल्याने गावात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून गावकरी जागे झाल्याने चोरीचा प्रयत्न फसल्याचे समोर आले आहेे.

नेले मध्यवर्ती शाखेचे अधिकारी प्रदीप पांडुरंग गायकवाड (रा. गडकर आळी, सातारा) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 7 रोजी नेले येथील जिल्हा मध्यवर्ती नेले शाखा नेहमीप्रमाणे सायंकाळी बंद केली. रविवारी सुट्टी असतानाही बँकेचे अधिकारी यांना नेले गावातून बँक फोडण्याचा प्रयत्न झाला असल्याचा फोन पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास आला. या घटनेची त्यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांना फोन करून माहिती दिली. तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व पाहणी केली. चोरट्यांनी बँकेच्या शटरचे हूक काढून आत जाण्याचा प्रयत्न झाला असल्याचे समोर आले.

या घटनेची सातारा तालुका पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी केली असता अज्ञात चोरट्यांनी हेक्सा पानाच्या साहाय्याने शटरचे हूक कापल्याचे निर्दशनास आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर त्यानुसार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, गावात चोर शिरल्यानंतर काही ग्रामस्थांना जाग आली. त्यांनी तत्काळ या घटनेची माहिती पोलिस पाटील यांना दिल्यानंतर पुढील चोरीचा अनर्थ टळण्यास मदत झाली. तसेच ग्रामस्थ, पोलिस जमल्यानंतर चोरट्यांनी सोबत आणलेले हेक्सा ब्लेड, हातोडा, मार्तुल, कात्री घटनास्थळी टाकून पोबारा केला.