Tue, Apr 23, 2019 10:02होमपेज › Satara › सातार्‍यात फेसबुकवर महिलेची बदनामी

सातार्‍यात फेसबुकवर महिलेची बदनामी

Published On: Feb 08 2018 1:54AM | Last Updated: Feb 07 2018 11:34PMसातारा : प्रतिनिधी

सातार्‍यातील एका महिलेचे फेसबुकवर बनावट अकाऊंट काढून त्यावर  अश्‍लील संवाद साधून बदनामी केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात एका महिलेवरच गुन्हा दाखल झाला असल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, रूपाली मयेकर या संशयित महिलेने अकाऊंट काढल्याने तसा गुन्हा दाखल झाला आहे; मात्र हे अकाऊंट संशयित महिलेने की अन्य कोणी काढले, याबाबतचा तपास सुरू आहे.

सातारा  शहर पोलिस ठाण्यात 31 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. दि. 18 ते 30 डिसेंबर 2017 या कालावधीत या सर्व घटना घडल्या आहेत. तक्रारदार महिलेला या कालावधीत फोनवर अनेक अनोळखी फोन येत होते. फोनद्वारे बोलणारी व्यक्‍ती ‘तुम्हीच फोन करायला सांगितले आहे,’ असे म्हणायचे. धक्‍कादायक बाब म्हणजे, हे फोन रात्री अपरात्री येत होते. तक्रारदार महिलेने फोनवरील व्यक्‍तीला मोबाईल नंबरबाबत  विचारल्यानंतर, फेसबुकवर तुम्हीच चॅटिंग करून दिला असल्याचे समजले. तक्रारदार महिलेने त्रासाला कंटाळून फेसबुक अकाऊंट  तत्काळ बंद केले. मात्र, तरीही फोन येण्याचे प्रकार थांबत नव्हते. अखेर त्या महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेतल्यानंतर सातारा सायबर सेल पोलिस ठाण्याने प्राथमिक तपासाला सुरुवात केल्यानंतर बनावट अकाऊंट काढल्याचे समोर आले. संबंधित बनावट अकाऊंट  रुपाली मयेकर या महिलेने काढले असल्याचे समोर आल्याने पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. महिलेवरच याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली असून पुढील तपास पोलिस करत आहेत.