Tue, May 26, 2020 17:20होमपेज › Satara › कराड विमानतळ विस्तारवाढ बेकायदेशीर

कराड विमानतळ विस्तारवाढ बेकायदेशीर

Published On: Sep 20 2019 1:45AM | Last Updated: Sep 19 2019 10:40PM
सातारा : प्रतिनिधी

कराड विमानतळ विस्तारवाढ बेकादेशीर झाली असून त्याठिकाणच्या जमिनी संपादन करणार्‍या संबंधित अधिकार्‍यावर कारवाई होणार आहे. विमान कंपनीने जमिनी संपादित करू नयेत, असे आदेश पुण्याचे विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिले असल्याची माहिती श्रमुदचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बैठक होऊन ही विमानतळ विस्तारवाढ रद्द होणार असल्याचे त्यांनी सांगितले. आयुक्‍तांबरोबर सकारात्मक चर्चा झाल्याने आंदोलनाच्या पहिल्या टप्प्याचा विजय झाला असून ते स्थगित करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

डॉ. पाटणकर म्हणाले, कराड विमानतळ विस्तारवाढ रद्द व्हावी, यासाठी गेले 53 दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंढे, वारुंजी, केसे, पाडळी, गोटे आणि सुपने येथील लोक उपोषणास बसले होते. याबाबत वारंवार मंत्रालय, जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठकाही झाल्या. मात्र, सकारात्मक चर्चा न झाल्याने आंदोलन सुरु ठेवण्यात आले होते. मात्र, सोमवार दि. 16 रोजी पुणे आयुक्‍त डॉ. म्हैसेकर, उपायुक्‍त दीपक नलवडे, अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांच्यासह आमच्या शिष्टमंडळाची बैठक झाली असून त्यात साकारात्मक चर्चा झाली आहे.

विमानतळ विस्तारवाढीसाठी बेकायदा जमिनी संपादन करण्यात आल्या आहेत, त्याची चौकशी करून त्या अधिकार्‍यावर कारवाई होणार आहे. याप्रश्नी प्रधान सचिव भूषण गगराणी यांनी लवकरच मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याशी बैठक लावू, असे आश्वासन दिल्याने या आंदोलनाच्या पहिल्या टप्प्याचा विजय झाला असल्याचे  पाटणकर यांनी सांगितले. कंपनीच्या पदाधिकार्‍यांनी आम्ही शेतकर्‍यांना मोठे पॅकेज देऊ असे सांगितले होते, मात्र तरीही आम्ही जमिनी देणार नाही यावर ठाम असल्याने त्यांचा हा डाव आम्ही हाणून पाडला असल्याचे डॉ. पाटणकर यांनी सांगितले. दरम्यान, तारळी धरणग्रस्तांच्या आंदोनाबाबत साकारात्मक निर्णय चालल्याने त्यांचेही आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी डॉ. प्रशांत पन्हाळकर, चैतन्य दळवी, पंजाबराव पाटील, सिद्धेश्वर पाटील, महादेव पाटील, आनंदराव जमाले आदी उपस्थित होते.

उदयनराजे आमच्या सोबत असू किंवा नसू, आमच्या आंदोलनाच्या भुमिकेवर आम्ही ठाम आहोत. कोणीही कुठेही गेले तरी आमचे आंदोलन थांबणार नाही. जनतेचा लढा हा कोणासाठी कधीच थांबत नाही. जनता निर्णय घेणार आहे, त्यामुळे जनतेशी गद्दारी करणार्‍यांची गय केली जाणार नसल्याचे पाटणकर यांनी सांगितले.