होमपेज › Satara › अंगणवाड्यांमध्ये कालबाह्य पोषण आहार

अंगणवाड्यांमध्ये कालबाह्य पोषण आहार

Published On: Dec 08 2017 1:43AM | Last Updated: Dec 07 2017 11:00PM

बुकमार्क करा

मेणवली : अनिल काटे

चिखली परिसरातील काही अंगणवाड्यांमध्ये पोषणआहाराचे पुडे कालबाह्य  झाल्याचे व चक्क उंदीरमामाने कूरतडल्याचे अन्नभेसळच्या तपासणी पथकाला आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असून याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी जनतेतून केली जात आहे.

महिला व बालविकास कल्याण सेवा प्रकल्प अंतर्गत अंगणवाडी सेविकांमार्फत ग्रामीण भागातील लहान मुले, गरोदर माता व कुमारिका कुपोषित राहू नयेत यासाठी शासनाकडून पंचायत समिती व महिला, बाल कल्याण सेवा विभागाच्या  देखरेखेखाली शिरा,उपमा, शेवया, सुकडीसह अन्य पोषण आहार पुरवला जातो. त्यामुळे  वाई तालुक्यातील अंगडवाड्या तपासणीमध्ये आढळलेला कालबाह्य पोषण आहार पहाता वाई पंचायत समितीसह संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांच्या एकूण कारभारावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

पोषण आहार पुरवणारा ठेकेदार व महिला बालकल्याण  यांचा एकमेकांचा जिव्हाळयाचा ठेका असल्यामुळेच आलेला माल तपासणी न करताच प्रत्येक अंगणवाडीत पोचवला गेल्याने ठेका कुणाचा अन् ठोका बसणार कुणाला? अशी चर्चा वाई तालुक्यात रंगली आहे.अशा पोषण आहाराचा कुमारिका, गरोदर माता व कोवळया बालकांच्या आरोग्यावर   काही विपरीत परिणाम झाल्यास याबाबत जबाबदार कोणाला धरणार? असाही सवाल उपस्थित केला  जात आहे. एवढे घडूनही त्याची कुठेही वाच्यता न करणारा महिला बाल कल्याण विभाग याप्रकरणी काय भूमिका घेणार याकडे सामान्य जनतेचे लक्ष लागले आहे.

अर्थात या प्रकाराने सर्वच अंगणवाडी सेविकांची पळताभुई झाल्याचे चित्र वाई तालुक्यात पहावयास मिळत आहे. अन्नभेसळ विभागाच्या अचानक धाडीमुळे संबंधित विभागाचा सावळा गोंधळ उजेडात आला आहे.

आहार पाकिटांची तपासणी सुपरवायझरनी केली का?

तालुक्यात एकूण 239 अंगणवाडया असून त्यांना आलेल्या पोषण आहाराच्या तपासणीसाठी स्वतंत्र दहा सुपरवायझर शासनाने तैनात केले असून प्रत्येकाला महिन्यातून विभागवार वीस वेळा भेटी देवून तपासणी करणे क्रमप्राप्त व बंधनकारक आहे. असे असताना कालबाहय आहार सापडतोच कसा? त्यांनी या आहाराच्या पाकीटांची तपासणीच केली नसल्याचे यातून सिध्द होत आहे.