Wed, Feb 26, 2020 20:39होमपेज › Satara › पश्‍चिमेचा बळीराजा अस्मानी संकटात

पश्‍चिमेचा बळीराजा अस्मानी संकटात

Published On: Sep 14 2018 1:33AM | Last Updated: Sep 13 2018 9:00PMसातारा : योगेश चौगुले

सातारा जिल्ह्यात गतवर्षी पेक्षा पावसाने यावर्षी चांगलीच हजेरी लावून बळीराजाची दानादान उडवली आहे.  जिल्ह्याच्या पश्‍चिम भागाला झोडपून काढत जावली, महाबळेश्‍वर, वाई, पाटण व सातारा तालुक्यात अति वृष्टीने पिके धोक्यात आली आहेत. बळीराजा आसमानी संकटात सापडला असून पिकांची पाहणी करुन ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी करत आहे.

जून महिन्याच्या पहिल्या अठवड्यात बळीराजाच्या अपेक्षेप्रमाणे पावसाला सुरुवात झाली. अगदी मागीतल्याप्रमाणे पावसाने हजेरी लावल्याने बळीराजाही मनोमनी सुखावला. पेरणी, टोकणनी, रोप लावण यासारखी कामे वेळेत पूर्ण झाली. नाचणी, घेवडा ही पिके जोमाने वाढू लागली ; पण पावसाने आपला जोर कायम ठेवल्याने नाचणी, घेवडा ही पिके पिवळी पडू लागली आहेत. तर काही पिकांची वाड खुंटली आहे. जिल्ह्याच्या पश्‍चिम भागामध्ये अति वृष्टीची नोंद होऊ लागली असून हातातील पिके जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.

यामुळे शेतकर्‍यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे महाबळेश्‍वर पंचायत समितीने देखील मासिक बैठकीत ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करत ठराव केला आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्‍चिमेला पावसाचे प्रमाण जास्त असल्याने  भात, नाचणी, स्ट्रॉबेरी, ज्वारी, घेवडा, मूग, मका, ऊस यासह कडधान्य प्रामुख्याने घेतली जातात. खरीप हंगामामध्ये बटाटा व वाटाणा पिकाची लागवड करण्यात आली आहे. मात्र, पावसाने जूनच्या पहिल्या आठड्यापासूनच जोर दार हजेरी लावली असून अति पावसाने पिके आता पिवळी पडू लागली आहेत. अति वृष्टीने पिकांचे नुकसान झाले असतानाच दुसरीकडे गवे, मोर, सायळ, डुकरे आदी वन्य प्राण्यांचा पिकात वावर वाढल्याने पिकांची नासाडी झाली आहे. यामुळे बळीराजा हवालदील झाला आहे.