Mon, Jan 21, 2019 23:41होमपेज › Satara › ‘पारदर्शक’ कारभाराचा ‘फुगा’ फुटला

‘पारदर्शक’ कारभाराचा ‘फुगा’ फुटला

Published On: Mar 15 2018 1:20AM | Last Updated: Mar 15 2018 12:06AMकराड : चंद्रजित पाटील

काही वर्षांपासूून एजंटमुक्‍त कार्यालय, सर्वसामान्यांना आपुलकीची वागणूक तसेच नावीन्यपूर्ण उपक्रमांद्वारे स्वतःची पाठ थोपटून घेणार्‍या कराडच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या ‘पारदर्शक कारभारा’चा फुगा फुटला आहे. बनावट पावत्यांसह चक्‍क आठ पावती पुस्तकेच गायब झाल्याने या कार्यालयाच्या ‘आदर्शाची’ लक्‍तरे वेशीवर टांगली गेली आहेत. लाखोंचा अपहार होऊनही अधिकार्‍यांना याबाबत काहीच माहिती नसणे, हे म्हणणे धाडसाचे ठरेल. त्यामुळेच या गंभीर प्रकरणी अधिकार्‍यांचीही सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. 

2011 साली 21 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर कराडला उपप्रादेशिक परिवहन कार्यालय तत्कालीन मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नांमुळे मंजूर झाले होते. कराड व पाटण तालुक्यांतील नागरिकांना या कार्यालयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. काही वर्षापासून एजंटमुक्त कार्यालय असा अधिकार्‍यांकडून डांगोराही पिटला जात होता. मात्र, वस्तुस्थिती त्याहून वेगळी होती. आरटीओ कार्यालयातील अर्ज ऑनलाईन भरणे, अनेक अर्ज इंग्रजीत असल्याने ग्रामीण भागातील सर्वसामान्यांना एजंट लोकांकडे गेल्याशिवाय पर्यायच नव्हता. त्यामुळेच खुलेआम एजंट लोकांकडून जादा पैसे घेत होेते.

आरटीओ कार्यालयात एजंटांचा अक्षरशः सुळसुळाटच होता. तो सुळसुळाट किती होता, हे आठ गायब पुस्तकावरून लक्षात येते. आरटीओ कार्यालयातील पैसे भरण्यासाठी तसेच अन्य विभागांची रचना पाहता सर्वसामान्यांना सहजपणे संबंधित विभागात जाताच येेणे शक्य नाही. त्यामुळे एजंट पावती पुस्तके ठेवलेल्या ‘त्या’ ठिकाणी कसे पोहचले? कोणी कर्मचारीच या प्रकरणामागे नाही ना ? असे प्रश्‍न निर्माण झाले आहेत. याशिवाय आरटीओ कार्यालयात चोरी होत असेल तर सर्वसामान्यांनी दिलेल्या कागदपत्रांचा भविष्यात कोणाकडून चुकीचा वापर होणार नाही? हे कोणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही.

ज्या व्यक्तींच्या चौकशीनंतर बनावट पावती पुस्तकासह आठ गायब पावती पुस्तकांची माहिती समोर आली आहे, त्या व्यक्तीकडे असेलेली पावती आणि प्रत्यक्षात आरटीओ ऑफिसमधील पावती असलेले पुस्तक वेगळे आहे. त्यामुळे बनावट पावती पुरस्तकांना आरटीओ कार्यालयापर्यंत पाय कसे फुटले? आरटीओ ऑफिसमध्ये त्या बनावट पावती पुस्तकांचा वापर करून लोकांकडून कोणी पैसे उकळले ? ते पैसे कोणाच्या खिशात गेले ? तसेच या पैशात कोण - कोण ‘वाटेकरी’ आहेत ? या सर्व बाबींची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.

याप्रकरणी केवळ एजंट लोकांचाच हात असल्याचे कसे मानायचे? असा प्रश्‍न उपस्थित करत आरटीओ कार्यालयातील काही कर्मचार्‍यांनीही ‘झारीतील शुक्राचार्यां’ची भूमिका निश्‍चितपणे बजावली असण्याची शक्यता आहे.