Fri, Apr 26, 2019 09:25होमपेज › Satara › दूधदरवाढीनंतरही पशूपालक हवालदिल

दूधदरवाढीनंतरही पशूपालक हवालदिल

Published On: Aug 13 2018 1:23AM | Last Updated: Aug 12 2018 10:00PMऔंध : सचिन सुकटे

दूध दरवाढीनंतरही  अतिरिक्त दुधाचा प्रश्‍नही शेतकर्‍यांना  भेडसावू लागला आहे. याचा परिणाम दूध दरावर  होत आहे. गायीच्या दुधाला दिलेला प्रतिलिटर 25 रुपये दर हाही तुटपुंजा ठरतो आहे. वाढलेले खाद्याचे दर, जनावरांचा औषधांचा  खर्च, भाकड जनावरांचा प्रश्‍न यामुळे हा व्यवसाय आतबट्ट्यात येत असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. 

ग्रामीण भागातील शेतकरी  जोडव्यवसाय म्हणून दूध  व्यवसायाकडे वळला आहे. काही तरूणांनी कर्जप्रकरणे  करून जनावरांचा गोठा, मुक्त गोठा पद्धतीने दूध व्यवसाय  सुरू केला  आहे. गायीच्या दुधाचा दर प्रतिलिटर 25 च्या घरात असतानाही हा व्यवसाय परवडत नसल्याचे पशुपालकांचे म्हणणे आहे. 17 रुपये प्रतिलिटरपर्यंत दुधाचे दर खाली आल्याने पशुपालकांचे कंबरडे मोडले होते. यामुळेच दूध आंदोलन राज्यभर झाले. 

गोवंश हत्त्या कायद्याने भाकड जनावरांचे करायचे काय, हा प्रश्‍न पशुपालक शेतकर्‍यांपुढे आहे. भाकड जनावरे संभाळणे मुश्कील झाले आहे.  त्यांच्यावरील खर्चाने पशुपालक आतबट्ट्यात येत आहे. म्हशींचा भाकड काळ जास्त आहे. त्यामुळे अशी जनावरे गाई, म्हैशी सांभाळणे शेतकर्‍यांना अवघड झाले आहे. बैलगाड्यांच्या शर्यतीवर बंदी आल्याने खिलार खोंडांची मागणी कमी झाली आहे. यांत्रिकीकरणामुळेही बैलांची संख्या वेगाने कमी होत आहे. यामुळे देशी गाय संभाळण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

म्हैशींच्या तुलनेत गायींचा  औषधपाण्याचा खर्च जास्त आहे. ऊस चार्‍यात ऑक्झॅलिक अ‍ॅसीडचे प्रमाण जास्त असल्याने जनावरांच्या शरीरावर त्याचा परिणाम होत असल्याचे पशुवैद्यकांचे  म्हणणे आहे. ऑक्झॅलिक अ‍ॅसीडचा गायींच्या गाभण क्षमतेवर परिणाम होत आहे. तसेच हास्कसारख्या खाद्याने जनावरांच्या लिव्हरवर परिणाम होत असल्याने वैद्यकीय खर्चात वाढ होत आहे. पशुखाद्याचे दरही वाढले आहेत. जुलै महिन्यात शासनाने गाईच्या 3.5 फॅट, 8.5 एसएनएफ, 3.2 प्रोटीन असणार्‍या दुधास 25 रुपये दर जाहीर केला आहे. हिरव्या चार्‍यामुळे काही ठिकाणी गाईंच्या दुधाची फॅट 3 पर्यंत तर एस.एन.एफ. 8.3 पेक्षा कमी येतो. त्यामुळे हाही प्रश्‍न  पशुपालकांना भेडसावणारा आहे.