सातारा : प्रतिनिधी
गिनीज वर्ल्ड ऑफ बुकमध्ये नोंद झालेली पीएनबी मेटलाईफ सातारा हिल हाफ मॅरेथॉन रविवारी दिमाखात पार पडली. 8 हजारांपेक्षा जास्त स्पर्धकांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत गतवर्षीप्रमाणेच इथिओपियाच्या धावपटूंनी याहीवर्षी सरस कामगिरी करत पुरुष व महिला गटात आपले वर्चस्व कायम ठेवले. विशेष म्हणजे इथिओपियाच्या धावपटूंबरोबरच सातारकर धावपटूंनी पाठोपाठ मॅरेथॉन पूर्ण केल्याने सातारकरही ‘हम भी किसीसे कम नही’ अशा जोशात धावले. मांढरदेवचा आदिनाथ भोसले हा भारतीय पुरुष गटात प्रथम, खिंडवाडीचा स्वप्नील सावंतने द्वितीय तर भारतीय महिला गटात जनाबाई हिरवे तृतीय क्रमांक पटकावला.
पीएनबी मेटलाईफ सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेसाठी इथिओपिया, केनिया, फिनलँड, जर्मनी, इंग्लड, केनिया यासह अन्य देशातील 60 धावपटूंनी सहभाग घेतला होता. सकाळी 6 वाजता फ्लॅग दाखवल्यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली. काही क्षणातच धावपटू सातारा तालीम संघ मैदानावरुन हलगीच्या आणि तुतारीच्या निनादात राजवाड्याच्या दिशेने धावत गेले. चुरशीने झालेल्या स्पर्धेमध्ये पुरुष गटात इथिओपियाच्या सिकीयास अबात याने 1 तास 7 मिनिटे 57 सेकंदात सुमारे 21 कि.मी.चे अंतर पार करुन प्रथम क्रमांक मिळवला. तर इथिओपियाच्याच ऑडिलाडिल्यू मॅमो याने 1 तास 9 मिनिटे 14 सेकंदात हे अंतर पार केले. केनियाच्या जॉन सेलेल याने 1 तास 10 मिनिटे 27 सेकंद या वेळेत हे अंतर पार केले. त्यांनी अनुक्रमे पहिले तिन्ही क्रमांक पटकावले.
महिलांच्या 21 कि.मी. गटात इथिओपियाच्या अबिबेज गेला हिने हे अंतर पार करण्यासाठी 1 तास 20 मिनिटे 01 सेकंद एवढा वेळ नोंदवला. तसेच केनियाच्या पास्कालिया चिफकोगेल हिने 1 तास 21 मिनिटे 32 सेकंद एवढा वेळ घेतला. इथिओपियाच्या मेसरेट बिरु हिने 1 तास 22 मिनिटे 17 सेकंद एवढा वेळ नोंदवला.
भारतीय पुरुष खुल्या गटात खिंडवाडी, मांढरदेव येथील आदिनाथ भोसले यांनी 21 कि.मी. अंतर 1 तास 17 मिनिटे 9 सेकंदात पार करत पहिला क्रमांक मिळवला. त्यापाठोपाठ खिंडवाडीच्या स्वप्नील सावंत यांनी 1 तास 17 मिनिटे 19 सेकंद एवढा वेळ घेतला. तर पालघरच्या काशिनाथ गोरे यांनी 1 तास 18 मिनिटे 41 सेकंद एवढा वेळ नोंदवत तिसरा क्रमांक पटकावला. भारतीय महिलांच्या 21 कि.मी. खुल्या गटात पुण्याच्या मनिषा साळुंखे यांनी 1 तास 35 मिनिटे 32 सेकंद एवढा वेळ घेत पहिला तर प्रियांका चावरकर यांनी 1 तास 36 मि. 10 सेकंद वेळ नोंदवत दुसरा क्रमांक पटकावला. मांढरदेव येथील जनाबाई हिरवे यांनी 1 तास 37 मि. 56 सेकंद एवढा वेळ नोंदवत तिसरा नंबर पटकावला.
हिरोज फन रनमध्ये विविध वेशभूषा साकारलेल्या 14 स्पर्धकांना गौरवण्यात आले. यामध्ये बाहुबली, खली, स्पायडर म्यान, झाशीची राणी यासह अनेक वेशभूषा साकारल्या होत्या. विजेत्या स्पर्धकांना विशेष पोलिस महानिरीक्षक कृष्ण प्रकाश, सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष व दै. ‘पुढारी’चे वृत्तसंपादक हरीष पाटणे, सातारा तालीम संघ अध्यक्ष साहेबराव पवार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी मॅरेथॉन असोसिएशनचे डॉ. संदीप काटे, देवदत्त देव, सुजीत जगधणे, डॉ. प्रताप गोळे, अॅड.कमलेश पिसाळ, डॉ.शेखर घोरपडे, सीए.विठ्ठल जाधव, सचिव डॉ.सुचित्रा काटे, डॉ. निलेश थोरात, डॉ.संदिप लेले, भाग्यश्री ढाणे आदी मान्यवर उपस्थित होते.