Mon, Jul 22, 2019 13:29होमपेज › Satara › पोलिस पाल्यांची यंदा शाळा भरणार हो!

पोलिस पाल्यांची यंदा शाळा भरणार हो!

Published On: Feb 23 2018 1:17AM | Last Updated: Feb 23 2018 1:17AMसातारा : विठ्ठल हेंद्रे

पोलिसांच्या मुलांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात केली असून सन 2018-19 साठी म्हणजे यंदापासूनच ज्युनिअर नर्सरी ते पहिलीपर्यंतचे प्रवेश पोलिसांच्या पाल्यांना दिले जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. गोळीबार मैदान येथील खासगी जागेत इंग्लिश मीडियम व सीबीएसईच्या धर्तीवर शाळा सुरु होणार आहे. दरम्यान, ‘सातारा पोलिस पब्लिक स्कूल’ अंतर्गत स्कूलची स्थापना केली जाणार असून दै.‘पुढारी’ने याबाबत नेहमी पाठपुरावा केला आहे.

गेल्या अनेक वर्षापासून पोलिसांच्या पाल्यांना किमान चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे व त्यासाठी पोलिसांचे स्कूल असावे, अशी मागणी होत होती. दरवर्षी मात्र मागणी होऊन त्याला वाटाण्याचा अक्षता लावल्या जात होत्या. पोलिस दलामध्ये काम करणार्‍या पोलिसांच्या अनेक अडचणी आहेत. मुळातच जेमतेम पगार व कामाच्या तासाचे अनियमित स्वरुप यामुळे पोलिसांच्या कुटुंबियांची एकप्रकारे वाताहत होत होती. शिक्षणाच्या वाढत्या खर्चामुळे पोलिस आपल्या पाल्यांना नगरपालिका किंवा गावाकडील जिल्हा परिषदेच्या शाळेतच शिकवण्यासाठी घालत असल्याचे वास्तव आहे.

सध्या पोलिसांना आपल्या पगारातून घर खर्च व मुलांचे जेमतेम शिक्षण पूर्ण करणे एवढ्यावरच त्याची सेवा संपत आहे. पोलिसांना आपल्या पगारातून मुलांना चांगले शिक्षण देऊ शकत नसल्याचे शल्य कायम आहे. सातारा जिल्हा पोलिस दलातील बहुतेक पोलिसांचे पाल्य चाकोरीबध्द व नगरपालिका तसेच जिल्हा परिषदेच्या शाळेतच शिक्षण घेत आहेत. पोलिस कर्मचार्‍यांना किमान सेवा देता यावी यासाठी आता जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी प्लॅन आखला असून यंदा 2018 सालापासून पोलिसांच्या पाल्यांना इंग्लिश मीडियम  स्कूल व सीबीएसईच्या धर्तीवरचे शिक्षण मिळावे यासाठी प्रवेश देणार असल्याची घोषणा केली आहे.

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी परिक्षेत्राचा कार्यभार घेतल्यानंतर सातारा येथे भेट दिली होती. पहिल्या भेटीत त्यांनी पोलिस कर्मचार्‍यांशी संवाद साधत अडचणी सांगण्याचे  आवाहन केले होते. त्यावेळी पोलिसांनी आपल्या पाल्यांना उत्तम दर्जाचे माफक दरात शिक्षण मिळावे, अशी मागणी केली. पोलिसांच्या या मागणीला उत्तर देताना नांगरे-पाटील यांनी पोलिसांच्या पाल्यांसाठी स्कूल स्थापण्याचे आश्‍वासन दिले होते. दरम्यान यासाठी दै.‘पुढारी’नेही  वेळोवेळी पाठपुरावा केला होता.

सध्या पोलिस वसाहतीचा प्रश्‍न ज्वलंत बनला आहे. प्राथमिक सुविधांची वानवा असल्याने पोलिस कुटुंबियांचे एकप्रकारे खच्चीकरण होत आहे. घुशी, उंदीर, अस्वच्छतेची बजबजपुरी याने पोलिस वसाहत घेरली आहे. पोलिसांच्या पाल्यांच्या शिक्षणाचा विषय ज्या पध्दतीने मार्गी लागला आहे त्याच पध्दतीने पोलिस वसाहतीचा आपणच विषय निकालात काढावा, अशी मागणी पोलिसांकडून होत आहे.

फी मध्ये 50 टक्के सवलत..

पोलिसांच्या पाल्यांना यंदापासूनच शिक्षणाची सोय व्हावी, यासाठी मास्टरप्लॅन करण्यात आला आहे. पोलिस कल्याण निधीअंतर्गत गोळीबार मैदान येथे सातारा पोलिस पब्लिक स्कूलची स्थापना होणार आहे. या शाळेचे मॅनेजमेंट कराड येथील कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेकडे राहणार आहे. शाळेमध्ये 50 टक्के विद्यार्थी पोलिसांचे पाल्य व 50 टक्के इतर पाल्य असे समीकरण ठेवले जाणार असून पोलिसांच्या पाल्यांना फी मध्ये 50 टक्के सवलत दिली जाणार आहे.

पुढील वर्षी नवीन इमारत राहणार..

पोलिसांंच्या पाल्यांसाठी यंदा खासगी जागेत शाळेची सुरुवात केली जाणार असून त्यामध्ये नर्सरी, ज्युनिअर केजी, सिनिअर केजी व पहिली असे वर्ग सुरु केले जाणार आहेत. पुढील वर्ग पुढच्या वर्षापासून सुरु केले जाणार असून तोपर्यंत सातारा पोलिस पब्लिक स्कूलच्या मालकीची इमारत उभी केली जाणार आहे. दरम्यान, जे पोलिस आपल्या पाल्यांचा या शाळेत प्रवेश घेण्यास इच्छुक आहेत त्यांना संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.