Wed, Jul 24, 2019 05:42होमपेज › Satara › मुर्दाड यंत्रणेवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा

मुर्दाड यंत्रणेवर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा

Published On: Apr 12 2018 1:18AM | Last Updated: Apr 11 2018 11:18PMसातारा : प्रतिनिधी

सातत्याने ज्या वळणाने बळी घेतले त्या खंबाटकी बोगद्यानंतर येणार्‍या ‘एस’ वळणाबाबत संबंधीत यंत्रणा अद्यापही मूग गिळून असल्याचेच दिसत आहे. मंगळवारी पहाटे तब्बल 18 बळी घेतल्यानंतरही हे वळण हटवण्याबाबत ठोस कार्यवाही झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आलेले नाही. त्यामुळे खंडाळ्यातील जनतेतून पुन्हा एकदा संतापाची लाट उसळली आहे. सातत्याने अपघात घडवणारे  हे वळण निर्माण करणार्‍या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकारी व ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल झाले नाहीत तर खंडाळ्यातील जनता महामार्गावर उतरेल व महामार्गावरून एकही वाहन जावू देणार नाही. रोज एका गावाने ‘एस’ वळणावर बसून रात्रं-दिवस महामार्ग अडवला तर काय अवस्था होईल? याचा विचार प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी करावा,  असा आक्रमक पवित्रा नागरिकांनी घेतला आहे. 

खंबाटकी घाटातील ‘एस’ कॉर्नरने अनेक प्रश्‍न उपस्थित केले आहेत. भीषण अपघातांची मालिका सुरु असणार्‍या या वळणावर अनेक बळी गेले आहेत. एवढेच काय खंडाळ्याच्या विकासात हातभार लावणारा खंडाळ्याचा युवा नेता अविनाश धायगुडे-पाटील यांचाही बळी याच वळणाने घेतला. रिलायन्सचे टोलवाले, एनएचएआयचे भानगडबाज अधिकारी व ठेकेदार ऐश करत असताना खंबाटकीच्या बोगद्यानंतर येणार्‍या वळणावर खंडाळ्यातील जनतेला रोजच मढी उचलण्याचे काम लागले आहे. मंगळवारच्या भीषण दुर्घटनेनंतर खंडाळ्यातील जनतेने थेट ‘पुढारी’च्या सातारा कार्यालयात संपर्क साधून ‘या विषयात तुम्हीच आवाज उठवा, सगळे एक करून हे वळण हटवा’, अशी कळकळीची विनंती  पुन्हा एकदा केली. 

खंबाटकी बोगदा ते टोलनाक्यापर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी असणार्‍या त्रुटींमुळे वारंवार अपघात घडत असून यामध्ये शेकडो जणांना आपल्या प्राणास मुकावे लागले आहे. या त्रुटी दुरुस्त करण्याबाबत रस्ते विकास महामंडळाला मुख्यमंत्र्यांनी सूचना देवूनही अद्याप कार्यवाही झाली नाही. या रस्त्याच्या त्रुटी तातडीने दुरुस्त न झाल्यास सर्वांना विश्‍वासात घेवून या प्रश्‍नावर रस्त्यावर येवून आंदोलन छेडले जाईल, अपघातास कारणीभूत असणार्‍या रस्ते विकास महामंडळाच्या अधिकार्‍यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई  करण्याची मागणी आता नव्याने जोर धरु लागली आहे. 

स्वातंत्र्य मिळून 64 वर्षे झाली. मात्र काय मिळवायचं असेल तर आहुती द्यावी लागते. जीव गमवावा लागतो. केंद्र सरकार, राज्य सरकार, एन.एच. आय. प्रशासन, कॉन्ट्रॅक्टर रस्त्याची सुधारणा करेल का? असा सवाल उपस्थित झाला असून त्रुटी दूर कराव्यात, अन्यथा आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा खंडाळा तालुक्यातील जनतेने दिला आहे.