Wed, Mar 20, 2019 22:58होमपेज › Satara › फलटणमध्ये अतिक्रमण मोहीम बासनात

फलटणमध्ये अतिक्रमण मोहीम बासनात

Published On: Jan 15 2018 1:44AM | Last Updated: Jan 15 2018 12:18AM

बुकमार्क करा
फलटण : यशवंत खलाटे 

फलटण शहरात क्रांतिसिंह नाना पाटील चौक ते रिंगरोडवरील अपघाताची संख्या वाढली आहे. यामध्ये अनेेकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर अनेक जण अंथरूणाला खिळून पडले आहेत. या परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर अतिक्रमणेच अपघाताला कारणीभूत आहेत. याबाबत अनेकदा तक्रारी होऊनही पालिका प्रशासन व सत्ताधारी लोकप्रतिनिधी कोणतीच कारवाई करताना दिसत नाहीत. त्यामुळे नगरपालिका अजून किती जणांचा बळी गेल्यानंतर कारवाई करणार? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 

शहरात भर रहदारीच्या जागेवर अतिक्रमणे वाढली आहेत. शहरातील रस्ते रुंद होण्याऐवजी अतिक्रमणामुळे अरुंद होत चालले आहे. यामुळे वारंवार वाहतूक कोंडी व अपघात वाढत आहेत. पालिकेकडून अतिक्रमणाची कारवाई करताना भेदभाव केला जात असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.  शहरातील विविध रस्त्यावर असलेली अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे वाढलेली असताना सत्ताधारी व प्रशासन मूग गिळून गप्प आहे. काही बड्या धेंडांनी तर मोकळ्या शासकीय जागेवर अतिक्रमण करुन ती भाड्याने दिली आहेत. अतिक्रमणांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना नगरपालिका मात्र गांधारीच्या भूमिकेत आहे.

जिल्ह्यात सर्वत्र अतिक्रमण हटाव मोहिम सुरू असताना फलटणमध्ये मात्र अतिक्रमण बचाव मोहिम सुरू असल्याचे दिसत आहे. अतिक्रमण केलेले व्यवसायिक व नगरसेवकांमध्ये आर्थिक साटेलोटे असल्याशिवाय या अतिक्रमणांना अभय मिळणार नाही, अशीही चर्चा रंगू लागली आहे. त्यासाठी नगरसेवकांनी स्वत:चा स्वार्थ न साधता नागरिकांचा विचार करून आवश्यक त्या सूचना प्रशासनाला देणे गरजेचे आहे. मात्र, नगरसेवकच अतिक्रमणाला पाठबळ देत असल्याची शंका दाट होऊ लागली आहे. 

बसस्थानक परिसरात ज्या हातगाड्यांवर पालिकेने कारवाई करून त्या हातगाड्यांना रिंगरोडवरील पूर्वेकडे नियोजित गेटच्या बाहेर गाडे लावण्यास परवानगी दिली.  त्यामुळे नक्की पालिका अतिक्रमण काढते की वाढवते हेच समजेनासे झाले आहे. अनेक बड्या लोकांनी अक्षरशः रस्त्यापर्यंत अतिक्रमण केले असताना त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही. 
सध्या बड्या धेंडांनी व काही अकार्यक्षम बिल्डरांनी तर फलटण शहराची वाट लावून टाकली आहे. 

मुख्याधिकार्‍यांनी यापूर्वी सांगोला व शिर्डी येथे धडाकेबाज काम केले आहे. त्या ठिकाणी त्यांनी अतिक्रमण हटाव मोहिम जोमात राबवली होती. मात्र, फलटणमध्ये ते का कच खात आहेत याचा थांगपत्ता लागत नाही. क्रांतीसिंह नाना चौक, पृथ्वी चौक येथे नागरिकांचे बळी गेल्यानंतरही मुख्याधिकारी व नगरसेवक याकडे ढुंकूणही पाहत नाहीत. त्यामुळे आणखी किती बळी गेल्यानंतर गेंड्याची कातडी ओढलेले पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी जागे होणार? असा प्रश्‍न उपस्थित केला जात  आहे.