Fri, Jan 24, 2020 23:16होमपेज › Satara › नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक; एकास अटक

नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक; एकास अटक

Published On: Dec 15 2017 2:46AM | Last Updated: Dec 14 2017 11:17PM

बुकमार्क करा

भिलार : वार्ताहर

मुंबई एअर पोर्टवर नोकरीला लावतो, असे आमिष दाखवून पाचगणी येथील तीन युवकांना 1 लाख 80 हजार रुपयांचा गंडा घालणार्‍या भामट्याला पाचगणी पोलिसांनी गुरुवारी मुंबई येथून ताब्यात घेतले.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, गोडवली, ता. महाबळेश्‍वर येथील मयूर सुनील मालुसरे हा नोकरीच्या शोधात होता. त्याला हेमंत बबल्या आचरे (रा.साकीनाका, मुंबई) हा सहारा विमानतळावर मुलांना नोकरी लावण्याचे काम करत असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून मयूर आणि त्याचे मित्र सुमित भरत दुधाणे व अजिंक्य सुनील दुधाणे (दोघेही रा. खिंगर) यांनी आचरे याची भेट घेतली. यावेळी आचरे याने तिघांना  सहारा विमानतळावर ‘एअरपोर्ट रेझुम एक्झिक्युटिव्ह’ या पदाची नोकरी लावण्याचे आमिष  दाखवले. त्यापोटी आचरे याने तिघांकडून टप्याटप्प्याने 1 लाख 80 हजार रुपये घेतले.

पैसे घेतल्यानंतर काही दिवसांनी नोकरी लावण्याबाबत विचारणा केल्यानंतर आचरे हा टाळाटाळ करू लागला. त्यानंतर या तिघांनी आचरे याच्याकडे दिलेल्या पैशाची मागणी केली. त्यापोटी आचरे याने तिघांना धनादेशही दिले. मात्र, हे धनादेश वटले नाही व आचरेही गायब झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर मयूर मालुसरे यांनी पाचगणी पोलीस ठाण्यात हेमंत आचरेच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

त्यानंतर पाचगणी पोलिसांनी आचरे याला मुंबईतून अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक एस. व्ही. कदम करत आहे.