Tue, Jun 18, 2019 22:18होमपेज › Satara › पाटण तालुक्यात नोकरदारांचा अनुशेष

पाटण तालुक्यात नोकरदारांचा अनुशेष

Published On: Jul 10 2018 1:04AM | Last Updated: Jul 09 2018 11:15PMपाटण : गणेशचंद्र पिसाळ

लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा शासनावरच नव्हे तर प्रशासनावरही प्रचंड दरारा होता. मात्र अलिकडच्या काळात हा दरारा तर सोडाच परंतु गरजेपुरतेही अधिकारी, कर्मचारी येथे कार्यरत नसल्याने जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेक विभागांना कोणी वालीच नाही. महिनोंमहीने ‘प्रभारी’ हिच काही विभागांची परंपरा बनली आहे. 

राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणार्‍या पाटण तालुक्यात गेली अनेक वर्षे केवळ श्रेयवाद, आरोप, प्रत्यारोप व शब्दांचे कलगीतुरे रंगविण्यातच येथील नेतेमंडळींनी धन्यता मानली आहे. जनसामान्यांशी निगडीत तालुक्यातील काही शासकीय कार्यालयातील गेल्या काही वर्षांतील रिक्त जागांचा प्रश्‍न आजही प्रलंबीत आहे. यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. याबाबत सत्ताधार्‍यांकडून प्रामाणिक प्रयत्न होत नाहीत, तर विरोधकांकडून आवाजही उठवला जात नाही .

‘पदरी पडले आणि पवित्र झाले’ ही मानसिकताच जन्माला घेऊन आलेल्या जनतेची सहनशीलता व सोशिकता निश्‍चितच वाखाणण्यासारखी असल्याने मग कुठे नेवून ठेवलाय पाटण तालुका आमचा हे विचारण्याचे धाडस नसल्याने मग ठेविले अनंते तैशीची रहावे, याची पदोपदी जाणीव होते. 

जनसामान्यांशी निगडीत काही विभाग व त्यातील रिक्त पदांचे सध्याचे वास्तव असे, एस. टी. आगार - वाहतूक नियंत्रक 2, लेखनिक 4, चालक 22, वाहक 20, वरिष्ठ मेकॅनिक, प्रमुख व सहाय्यक कारागीर प्रत्येकी एक असे एकूण 51. वीज वितरण कंपनी पाटण - उप अभियंता, बिलिंग लिपीक प्रत्येकी एक, वायरमन 13 एकूण 15 . भूमी अभिलेख - भुमिलेखाधिकारी, लेखनिक 3, भुकरमापक सर्वेअर 3, दप्तर रेकॉर्ड किपर 1, शिपाई 2 एकूण 10. कृषी विभाग - कृषी अधिकारी 4, पर्यवेक्षक 6, सहाय्यक 11, वरिष्ठ लिपिक 1, कनिष्ठ लिपीक 2, शिपाई 2 एकूण 26. नगरपंचायत पाटण - मुख्याधिकारी, टंकलेखक लिपिक 3, स्वच्छता निरीक्षक 2, पंप ऑपरेटर 3, मुकादम 3, प्रयोगशाळा सहाय्यक, वायरमन, सहाय्यक कार्यालय अधीक्षक, सहाय्यक मालमत्ता पर्यवेक्षक, कर निरीक्षक, लेखापाल, लेखा परीक्षक, स्थापत्य अभियंता श्रेणी एक, पाणी पुरवठा स्वच्छता अभियंता, नगर रचनाकार सार्वजनिक बांधकाम प्रत्येकी एक अशा एकूण 21. वन विभाग - वनरक्षक एक. उप विभागीय अधिकार, अव्वल कारकून, ग्रामीण पाणीपुरवठा - शाखा अभियंत, जिल्हा परिषद बांधकाम - उप अभियंता, लेखनिक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 4, शिपाई 2 एकूण 8. सार्वजनिक बांधकाम दक्षिण - शाखा अभियंता 2, स्थापत्य अभियांत्रिकी लिपिक, सहाय्यक, वरिष्ठ लिपिक, शिपाई, चौकीदार प्रत्येकी एक असे एकूण 7. सार्वजनिक बांधकाम पश्‍चिम - वरिष्ठ लिपिक 2, अभियांत्रिकी सहाय्यक 2, शिपाई, स्वयंपाकी प्रत्येकी एक असे एकूण 6 पदे रिक्त आहेत. पाटण प्रशासनाचा कारभार प्रभारी अधिकारी पाहत आहेत. त्यामुळे कामे विलंबाने होते आहेत.