Tue, Mar 26, 2019 22:26होमपेज › Satara › शिक्षक सहकारी बँकेतही नोकरभरतीचा घाट 

शिक्षक सहकारी बँकेतही नोकरभरतीचा घाट 

Published On: Mar 09 2018 1:37AM | Last Updated: Mar 08 2018 11:27PMसातारा : प्रतिनिधी 

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची नोकरभरती कायद्याच्या कचाट्यात अडकली असतानाच प्राथमिक शिक्षक बँकेच्या संचालक मंडळानेही नोकरभरतीचा घाट घातल्याची माहिती मिळत आहे. बँकेतील काहींना स्वेच्छानिवृत्ती देऊन नोकरभरती करायचे नियोजन करण्यात येत आहे. संचालकांचा एक गट गावोगावी फिरून चाचपणी करत आहे. मात्र, बँकेचे चेअरमन स्वेच्छा निवृत्तीही नाही आणि नोकरभरतीची तर गरजच नाही, तसेच सभासदांचा  विचार करुन कर्जावरील व्याजदर कमी करण्याच्या मतावर ठाम राहिल्याने चेअरमन विरूध्द संचालक असे दोन गट आमने-सामने आले आहेत. 

सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या पाठीमागच्या निवडणुकीत 21 पैकी 13 जागा ताब्यात घेत संभाजीराव थोरात आणि सिद्धेश्‍वर पुस्तके गटाने सत्ता स्थापन केली होती. चेअरमनपदी बलवंत पाटील तर व्हा. चेअरमनपदी मोहन निकम यांची निवड झाली होती. नूतन संचालक मंडळाच्या कार्यकाळात कर्जाचे व्याजदर कमी होत गेल्याने आणि बँकेचे उत्पन्न वाढत गेल्याने सभासदांमध्येे कधी नव्हे ते आनंदाचे वातावरण पहायला मिळू लागले. मात्र, आता बँकेतील वातावरण गढूळ व्हायला लागल्याचे दिसत आहे. नोकरभरतीच्या मुद्यांवरुन बलवंत पाटील आणि संचालकांमध्ये बेबनाव झाल्याचे दिसत आहे.

25 फेब्रुवारी रोजी संचालक मंडळाची मासिक सभा झाली. सभेत संचालकांनी स्वेच्छा निवृत्तीचा विषय काढला. काही ठराविक पगारांची रक्कम देऊन ही योजना राबवण्याची चर्चा करण्यात आली. त्यानंतर नवीन नोकरभरतीचाही विषय मांडण्यात आला. सभेत चेअरमन बलवंत पाटील यांनी स्वेच्छा निवृत्ती सभासदांच्या हिताची नाही. त्यापेक्षा आपण सध्याचे असणारे कर्जाचे व्याजदर 11 ते 14 टक्क्यांंवरुन 9 ते 11 टक्क्यांपर्यंत कमी करु शकतो, हे आकडेवारीवरुन सांगितले. या विषयावरुन सभेत प्रचंड वादंग झाले. सत्ताधारी श्रेष्ठींना सभेत पाचारण करण्यात आले. त्यांनीही संचालकांचे म्हणणे मान्य करावे लागेल, असे सांगितले. आपण नोकरभरती नाही केली तर पुढे येणारे करतील असेही काहींनी सांगितले. चेअरमन मात्र आपण पुढे येणार्‍यांनाही विरोध करु असे सांगत त्यांच्या मतांवर ठाम राहिले. वादावादीनंतर बलवंत पाटील सभेतून बाहेर गेले. त्यांच्या अनुपस्थितीत संचालक मंडळाने ऐन वेळच्या विषयात अनेक ठरावही मंजूर केल्याचे समजत आहे.

काही कालावधीनंतर फलटण तालुक्यात एक बैठक झाली. त्या बैठकीतही खडाजंगी झाली. तिथेही स्वेच्छा निवृत्ती आणि नोकरभरतीची गरजच नाही, यामध्ये सभासदांचे नुकसान आहे आणि कर्जाचा व्याजदर कमी करण्याच्या मुद्यांवर चेअरमन ठाम राहिले. नोकरभरती करणार असाल तर माझा राजीनामा घ्या, असेही त्यांनी सांगितल्याची माहिती मिळत आहे. त्या बैठकीतही या वादावर तोडगा न निघाल्याने बँकेतील वातावरण चांगलेच तापले आहे.