Wed, Apr 24, 2019 16:02होमपेज › Satara › लोककल्याण सह. सोसायटीत ३२ लाख रुपयांचा अपहार  

लोककल्याण सह. सोसायटीत ३२ लाख रुपयांचा अपहार  

Published On: Jun 19 2018 1:23AM | Last Updated: Jun 18 2018 11:08PMकराड : प्रतिनिधी

लोककल्याण मल्टिस्टेट के्रडिट सहकारी सोसायटी लि. मुंबई या संस्थेच्या कराड मार्केटयार्ड शाखेत सुमारे  32 लाख रुपयांचा अपहार झाल्याचे उघडकीस आले असून, या प्रकरणी कराड शहर पोलिस ठाण्यात सोसायटीच्या पदाधिकार्‍यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. फसवणूक झालेल्या ठेवीदारांची संख्या अधिक असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

खुद्दुस अमिरहमजा मुजावर (रा. कार्वे, ता. कराड) यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. यावरून सतीश विलास पाटील (रा. ठिकपुरली, जि. कोल्हापूर), आदिती अभिजित देशमुख (रा. विंग, ता. कराड) तसेच लोककल्याण सोसायटीच्या पदाधिकारी व कर्मचार्‍यांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.  यामुळे कराड शहर व परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली महिती अशी की, मुंबई येथील लोककल्याण मल्टिस्टेट के्रडिट सहकारी सोसायटीत असलेल्या संबंधित आरोपींनी मार्केटयार्ड कराड व मलकापूर येथे शाखा सुरू केली होती. त्यातील मार्केट यार्ड शाखेमध्ये खुद्दूस मुजावर यांनी वेळोवेळी ठेव म्हणून सुमारे साडेतीन लाख रूपयांची रोख रक्कम ठेवली होती. या ठेवीची मुदत संपूनही संबंधित सोसायटीने त्यांना ती परत केली नाही. यावर मार्केटयार्ड शाखेच्या आदित्य देशमुख यांच्या निदर्शनास  मुजावर यांनी ही बाब आणून दिली. मात्र देशमुख यांनी टाळाटाळ केली. 

ऑक्टोंबर 2017 ते  15 जून 2018 या दरम्यान फिर्यादी मुजावर यांच्यासह अन्य लोकांची ठेव म्हणून रक्कम स्वीकारली. यावर 14 टक्के दराने व्याज देण्याचे अमिषही ठेवीदारांना दाखविण्यात आले. मात्र संस्थेने ठेवीदारांच्या ठेवी परत केल्या नाहीत. 31 लाख 92 हजार 500 रूपयांचा अपहार झाल्याचे उघडकीस आले आहे. तसेच मलकापूर येथील  संस्थेच्या मुख्य कार्यालयात काही ठेवीदार पैसे मागण्यासाठी गेले असता, तेथील अमोल माने व दोन अनोळखी इसमांनी ठेवीदारांना दमदाटी केल्याचेही फिर्यादीमध्ये म्हंटले आहे. या घटनेची नोंद कराड शहर पोलिस ठाण्यात झाली असून, लोककल्याण मल्टिस्टेट सहकारी सोसायटी लि. मुंबईच्या पदाधिकारी, कर्मचार्‍यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.