Fri, Apr 26, 2019 19:41होमपेज › Satara › अकरा लाख विद्यार्थ्यांची बँक खातीच नाहीत

अकरा लाख विद्यार्थ्यांची बँक खातीच नाहीत

Published On: May 04 2018 1:49AM | Last Updated: May 03 2018 9:11PMसातारा : प्रविण शिंगटे

सर्व शिक्षा अभियानांतर्गंत मागील शैक्षणिक वर्षात मार्च 2018 मध्ये महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने केलेल्या पाहणीनुसार 10 लाख 90 हजार 633 विद्यार्थ्यांची बँक खाती अद्यापही उघडण्यात आली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही बँक खाती उघडण्याबाबतची कार्यवाही करण्याच्या सूचना महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने शिक्षणाधिकार्‍यांना दिल्या असून त्याचा अहवाल दि. 15 मेपर्यंत पाठवण्याचे आदेश बजावले आहेत.

राज्यात 2017 व 18 पासून सर्व शिक्षा अभियानांंतर्गत मोफत गणवेश योजनेची अंमलबजावणी राज्यात सर्वत्र करण्यात येत आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार लाभार्थी विद्यार्थ्यांचे बँक खाते राष्ट्रीयकृत, शेड्युल्ड, ग्रामीण  बँक व पोस्ट ऑफीसमध्ये शून्य शिलकीवर बँक खाते उघडण्याच्या सूचना राज्याच्या महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्यावतीने सर्व जिल्हा परिषदांना दिल्या होत्या. तसेच हे  बँक खाते आधारकार्ड क्रमांकाशी संलग्न करण्याबाबतही सूचना दिल्या होत्या.

सर्व शिक्षा अभियान अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2017 व 18 मध्ये  सुमारे 37 लाख 62 हजार 27  विद्यार्थी गणवेश योजनेसाठी पात्र होते. त्यापैकी 26 लाख 71 हजार 394 विद्यार्थ्यांची बँक खाती दि. 31 मार्च 2018 पर्यंत उघडण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. उघडण्यात आलेल्या खात्यांपैकी 21 लाख 73 हजार 487 विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात प्रत्यक्ष लाभाची तरतूद वर्ग करण्यात आली. मार्च 2018 अखेर उघडण्यात आलेल्या बँक खात्याची माहितीची पाहणी केली असता आदिवासी, दुर्गम भागात जेथे बँक किंवा पोस्ट ऑफीस जवळपास  उपलब्ध नाहीत अशा जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत 98.42 टक्के, गोंदिया 90.70 टक्के, गडचिरोली 90.21 टक्के, रत्नागिरी 98.54 टक्के  व सिंधूदुर्ग 95.81 टक्के बँक खाते उघडण्याबाबतची कार्यवाही झाली आहे.मात्र, अन्य जिल्ह्यात ही कार्यवाही समाधानकारक दिसून येत नाही.

राज्यातील सुमारे 10 लाख 90 हजार 633 इतक्या विद्यार्थ्यांची बँक खाते अद्याप उघडण्यात आलेले नाहीत. या लाभार्थी विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडण्याबाबतची कार्यवाही आपल्या स्तरावरून त्वरित करण्यात यावी. तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल दि. 15 मेपर्यंत राज्य कार्यालयास विनाविलंब सादर करण्याचे आदेश राज्याचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना दिले आहेत.केंद्र शासनाच्या पत्रानुसार समग्र शिक्षा अभियान योजनेंतर्गत मोफत गणवेश योजनेची  डीबीटीच्या धोरणानुसार अंमलबजावणी करण्यासाठी लाभार्थ्यांचे बँक खाते आधारशी संलग्न असणे आवश्यक आहे, असेही प्रधान सचिवांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी, प्रशासनाधिकार्‍यांना  काढलेल्या आदेशात म्हटले आहे.     

गणवेशाची रक्‍कम थेट बँक खात्यात

गणवेश योजनेंतर्गत 70 टक्के लाभार्थ्यांचे बँक खाते काढून, लाभाची रक्कम वर्ग करण्याचा प्रयत्न विभागाने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुढील शैक्षणिक वर्षामध्ये 100 टक्के लाभाचे हस्तांतरण रोख स्वरूपात न करता थेट लाभार्थी विद्यार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात यावे. बँक खात्यात तरतूद जमा करण्याच्या योजनेतून सूट देण्याबाबतची कार्यवाही करताना  अद्यापपर्यंत बँक खाते उघडण्यात न आलेले 30 टक्के लाभार्थ्यांचे  पुढील शैक्षणिक वर्ष 2018 व 19 सुरू होण्यापूर्वी उघडण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Tags : Satara, Eleven, lakh, students, bank, accounts