Fri, Apr 19, 2019 11:56होमपेज › Satara › शेती व घरगुती वीज ग्राहकांना ‘जोर का झटका’

शेती व घरगुती वीज ग्राहकांना ‘जोर का झटका’

Published On: Dec 04 2017 1:33AM | Last Updated: Dec 03 2017 10:27PM

बुकमार्क करा

पिंपोडे बुद्रुक : वार्ताहर 

महावितरणच्या वाठार स्टेशन उप विभागांतर्गत येणार्‍या शेती व घरगुती वीज ग्राहकांना अन्यायकारक वाढीव वीज बिले दिली असून सातत्याने अघोषित भारनियमन केले जात आहे. महावितरणच्या अधिकार्‍यांनी आपल्या कारभारात तातडीने सुधारणा न केल्यास वाठार स्टेशन उपविभागातील सर्व कार्यालयांना टाळे ठोकण्याचा इशारा संतप्त शेतकर्‍यांनी दिला आहे. 

कोरेगाव तालुक्याचा उत्तर भाग हा कायम दुष्काळी म्हणूनच ओळखला जातो. नैसर्गिक आपत्तीचा सामना करत शेतकरी आपली शेती कशी-बशी पिकवत आहे. गेल्या तीन चार वर्षात पर्जन्यमान अतिशय कमी झाले असल्यामुळे विहिरी कोरड्या पडल्या होत्या. गेल्या दोन महिन्यात झालेल्या पावसाने आत्ता कुठे विहिरीत पाणी आले आहे. तोच महावितरणकडून शेतकर्‍यांना हजारो रुपयांची वीज बिले देण्यात आली आहेत. विहिरीत पाणीच नाही तर हजारो रुपयांची बिले आलीच कशी असा प्रश्‍न शेतकरी विचारू लागले आहेत.आलेली वीज बिले ही वाढीव व अन्यायकारक आहेत.

त्याचबरोबर सातत्याने अघोषित भारनियमन करून शेतकरी वेठीस धरला जात आहे.दिवसा भारनियमन करून रात्रीच्या वेळी विज देऊन शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ चालू आहे.सध्या थंडी वाढली असल्याने रात्री पिकांना पाणी देणे अशक्य होत आहे. ज्या ठिकाणचे ट्रान्स्फॉर्मर जळाले असतील, चोरी गेले असतील अशा ट्रान्सफार्मरवर ज्या शेतकर्‍यांच्या वीज जोडणी असतील त्यांच्यापैकी किमान ऐंशी टक्के शेतकर्‍यांनी वीज बिल भरणा केला तरच असे ट्रान्सफार्मर दुरुस्त केले जातील अथवा नवीन बसवले जातील असा अलिखित फतवा महावितरणच्या अधिकार्‍यांनी काढला आहे.

हा महंमद तुघलकी कारभार शेतकर्‍यांना सहन करावा लागत आहे. वीज जोडण्या वर्षांनुवर्षेप्रलंबित आहेत. शेतामीहल वीज वाहक तारा लोंबकळत असल्याने अनेकदा शॉर्टसर्किट होऊन शेतकर्‍यांची उभी पिके अधिकारी व कर्मचारी यांच्या गलथान कामामुळे जळाली आहेत. त्याचे पंचनामे होऊन त्यांना आजतागायत भरपाई देण्यात आलेली नाही. उघडे डीपी बॉक्स, फुटके फ्यूज ही तर नित्याची बाब झाली आहे.