Wed, Feb 26, 2020 22:03होमपेज › Satara › विजेचा स्थिर आकार वर्षभरात झाला दुप्पट

विजेचा स्थिर आकार वर्षभरात झाला दुप्पट

Published On: Nov 17 2018 1:23AM | Last Updated: Nov 16 2018 10:47PMसातारा : विशाल गुजर

वीज नियामक आयोगाच्या निर्णयानुसार वीज वितरण कंपनीने वीजबिलाच्या स्थिर आकारात वाढ केली आहे. ही वाढ वर्षभरात तीन वेळा झाली आहे. यात विविध गटात 50 ते 88 टक्के वाढ झाली आहे. 2020 पर्यंत स्थिर आकार दरात वाढ करण्यात येणार आहे. यामुळे आता ग्राहकांना भुर्दंड सोसावा लागणार आहे.

कोळशाचा तुटवडा, डिझेल आणि पेट्रोलच्या वाढत्या किमती यामुळे ट्रान्सपोर्टचे वाढलेले दर, वीज गळती याचा परिणाम वीज निर्मितीवर झाला आहे. वीज नियामक आयोगाने स्थिर आकारात वाढ सूचविली आहे. 2016 ते 2020 पर्यंत चार टप्प्यात विजेची दरवाढ होणार आहे. 

यावर्षी तीन वेळा विविध गटातील स्थिर आकार दरात वाढ झाली आहे. मार्च 2017 मध्ये स्थिर आकार दर 55 रूपये होता. मार्च 2018 मध्ये घरगुती ग्राहकांचा स्थिर आकार दर 60 रूपये झाला. एप्रिलमध्ये 65 रूपये, सप्टेंबरमध्ये 80 रूपये करण्यात आला. हे वाढीव दर ऑक्टोबरच्या बिलात लावून आले आहेत. अशा पद्धतीने घरगुती थ्री फेज आणि व्यावसायीक ग्राहकांच्या बिलात वाढ झाली आहे.
घरगुती थ्री फेज ग्राहकांचा मार्च 18 मधील स्थिर आकर दर 170 रूपये होता. एप्रिलमध्ये 185 रूपये, सप्टेंबरमध्ये 300 रूपये करण्यात आला. व्यावसायीक ग्राहकांचा मार्च 18 मध्ये स्थिर आकार दर 250 रूपये होता. एप्रिलमध्ये 270 रूपये, सप्टेंबरमध्ये 350 रूपयांवर पोहचला. एप्रिल 2019 मध्ये आयोगाने आणखी वाढ सूचविली आहे. यातून वीज कंपनी विविध दुरूस्तीचे काम हाती घेणार आहे. मात्र, सर्वसामान्य ग्राहकांच्या वीज बिलात वाढीव रकमा येणार आहेत.

दरम्यान, बिलाच्या युनिटचे दर वाढिव बिलाचे धोरण ठरविताना 0 ते 100 आणि 100 ते 300 युनिटचा एक स्पॅन हा नियम बदलावा. त्याऐवजी 100 ते 200 युनिट असा स्पॅन तयार करण्यात यावा, अशी मागणी विविध ग्राहक संघटनेकडून होत आहे.

वीज ग्राहक संघटना आक्रमक...

वीजबिलाच्या युनिटमध्ये वाढ करण्यासाठी एमईआरसीकडून प्रथम सुनावणी घेतली. सप्टेंबरला त्याची अंमलबजावणी सुरू केली. ऑक्टोबरला हे वाढीव बिल लावून आले. यामध्ये युनिटला 22 ते 24 पैशांची वाढ नोंदवण्यात आली. यामुळे ग्राहकांच्या वीजबिलात वाढ झाली आहे. ही वाढ यापुढेही कायम राहण्याची शक्यता असल्याने वीज ग्राहक संघटनांनी आक्रमक पवित्र्या घेतला आहे.