Tue, Sep 17, 2019 22:40होमपेज › Satara › मुजवलेल्या विहिरीवरील मोटारीचेही वीज बिल

मुजवलेल्या विहिरीवरील मोटारीचेही वीज बिल

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

फलटण : प्रतिनिधी

गेल्या 10 वर्षांपूर्वी मुजवलेल्या विहिरीवर कोणतीही पाण्याची मोटार नसताना, विहिरी जवळ कोणतेही वीज कनेक्शन नसताना, मीटर नसताना महावितरणने त्या ग्राहकास 20 हजार 470 रुपयांचे बिल पाठवले असल्याची तक्रार आज कृषि उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी व्यथा निवारण केंद्राकडे दाखल झाली आहे.

तरडफ, ता. फलटण येथील शेतकरी अंकुश अलगुडे यांनी रामराजे शेतकरी व्यथा निवारण केंद्राकडे दिलेल्या तक्रारीनुसार, दहा वर्षांपूर्वी त्यांचे शेतात असणार्‍या विहिरीवर पाणी पंपासाठी वीज कनेक्शन होते.परंतु काही कारणास्तव त्यांनी दहा वर्षांपूर्वी आपली विहीर बुजवली व विहिरीवरील वीज कनेक्शनही बंद केले. सध्या तेथे कोणतेही वीज कनेक्शन अथवा लाईटचा पोल नाही, असे असतानाही महावितरणने मात्र, जून 2017 पर्यंतचे वीज बिल पाठवले आहे. पाठवलेल्या वीज बिलामध्ये मागील रिडींगसह, चालू रिडींग व एकूण वापरलेली वीज या कॉलममध्ये काहीही दर्शविलेले नाही. ते निरंक ठेवण्यात आले आहेत. मात्र, वीज देयक रक्कम 20 हजार 470 रुपये पाठवले आहेत. 

अंकुश अलगुडे यांनी महावितरणने केलेल्या अन्यायाची तक्रार शेतकरी व्यथा निवारण केंद्राकडे केली असता कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी तातडीने याची दखल घेत, महावितरणला नोटीस पाठवून हा अन्याय तातडीने दूर करण्यास सांगितले आहे.दरम्यान, महावितरणने याप्रकारे अनेक वृद्ध लोकांना भूलथापा मारून व काही ठिकाणी जबरी वसुली केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. फलटण येथील अधिकार्‍यांची चौकशी करण्याची मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex