Tue, Jun 02, 2020 01:23
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › सातारा : आता रंगणार धूमशान ग्रामपंचायतींचे

सातारा : आता रंगणार धूमशान ग्रामपंचायतींचे

Last Updated: Nov 07 2019 2:01AM
सातारा : प्रतिनिधी

आगामी चार महिन्यांत मुदत संपणार्‍या जिल्ह्यातील 12 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक तर 413 ग्रामपंचायतींमधील रिक्‍त जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्यामध्ये एका सरपंचपदाचाही समावेश आहे. संबंधित ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दि. 16 नोव्हेंबरपासून नामनिर्देशनपत्रे भरता येणार असून दि. 8 डिसेंबरला मतदान आहे. 

डिसेंबर 2019 ते मार्च 2020 या कालावधीत मुदत संपणार्‍या व नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक, सदस्यपदाच्या रिक्‍त जागांसाठी पोटनिवडणूक व थेट निवडणुकीतून भरण्यात येणार्‍या रिक्‍त सरपंचपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. दि. 6 नोव्हेंबर रोजी संबंधित ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध केली आहे. त्यानंतर दि. 16 नोव्हेंबरपासून दि. 21 रोजीपर्यंत इच्छुक उमेदवारांना नामनिर्देशनपत्रे दुपारी 3 वाजेपर्यंत सादर करता येतील. त्यानंतर दि. 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून उमेदवार अर्जांची छाननी केली जाईल.

दि. 25 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यानंतर उमेदवारांची अंतिम यादी तयार करून त्यांना चिन्हवाटप केले जाणार आहे. संबंधित ग्रामपंचायतींसाठी दि. 8 डिसेंबरला सकाळी  7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदान होणार आहे. 12 ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणूक होत असून  त्यामध्ये सातारा तालुक्यातील जांभगाव व आष्टी (पु.); पाटण तालुक्यातील बांधवट; खंडाळा तालुक्यातील गोळेगाव, दाबकेघर, साळव, देवघर; फलटण तालुक्यातील माझेरी, गोळेवाडी, परहर खुर्द; जावळी  तालुक्यातील खर्शी बारामुरे; खटाव तालुक्यातील दहिवड (पु.) या बारा ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

जिल्ह्यातील 413 ग्रामपंचायतींमधील रिक्‍त जागांसाठी पोटनिवडणूक लागली आहे. त्यामध्ये सातारा तालुक्यातील 56, कराड तालुक्यातील 40, खंडाळा तालुक्यातील 11, खटाव तालुक्यातील 26, माण तालुक्यातील 5, जावळी तालुक्यातील 74, फलटण तालुक्यातील 9, महाबळेश्‍वर तालुक्यातील 58, वाई तालुक्यातील 40, कोरेगाव तालुक्यातील 34 तर पाटण तालुक्यातील 78 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. सातारा तालुक्यातील कासारस्थळ या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचीही निवड करण्यात येणार आहे. दरम्यान, निवडणूक जाहीर झालेल्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे निवडणूक निकाल जाहीर होईपर्यंत त्याठिकाणी मतदारांवर प्रभाव टाकणारे कोणतेही कृत्य, घोषणा कुणालाही करता येणार नाही.