होमपेज › Satara › एसपींचा दणका; तीन टोळ्यांचा समावेश

आठ जण तडीपार

Published On: Sep 07 2018 1:06AM | Last Updated: Sep 06 2018 10:30PMसातारा : प्रतिनिधी

सातारा शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी मारामारी, खुनाचा प्रयत्न करणार्‍या तीन टोळींना जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी कारवाईचा दंडुका उगारून तडीपार केले. यामध्ये 8 जणांचा समावेश असून, एसपींचा हा एका महिन्यातील कारवाईचा दुसरा तडाखा आहेे. दरम्यान, या कारवाईने सातारा शहरासह जिल्ह्यातील भानगडबाजांचे धाबे दणाणले आहे.

अमर श्रीरंग आवळे (वय 32, रा. बुधवार नाका), सुजित ऊर्फ गुण्या सदाशिव आवळे (27, रा. बुधवार नाका, सातारा), अमीर फारुख शेख (29, रा. मलकापूर), लाजम अल्‍लाउद्दीन होडेकर (35, रा. गोटे), समीर ईस्माईल मुजावर (28, रा. आगाशिवनगर, सर्व ता. कराड), गणेश शंकर निंबाळकर (32), योगेश किसन निंबाळकर (29), आदिनाथ यसाजी निंबाळकर (35, सर्व रा. कोंडवे, ता. सातारा) अशी वेगवेगळ्या टोळीतील तडीपार केलेल्यांची नावे आहेत.

संशयित तिन्ही टोळ्यांवर विविध गंभीर गुन्हे दाखल आहेेत. यातील अमर आवळे, गणेश निंबाळकर व अमिर शेख टोळ्यांचे प्रमुख आहेेत. संबंधितांविरुध्द शाहूपुरी, सातारा तालुका व कराड शहर पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. या तिन्ही टोळीतील सदस्यांना पोलिसांनी सुधारण्याची संधी दिली होती. मात्र, संशयितांमध्ये सुधारणा होत नव्हती. सर्वसामान्य जनतेला त्यांचा त्रास होत होत असल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत होती. यामुळे संबंधितांचे तडीपारीचे प्रस्ताव तयार करुन ते पोलिस अधीक्षक कार्यालयात पाठवण्यात आले.

यावर पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या हद्दप्राधिकरणापुढे सुनावणी झाली. गुरुवारी संबंधितांना सातारा जिल्ह्यातून 1 वर्षासाठी तडीपार करण्याचे आदेश त्यांनी दिले.  कारवाई झाल्यानंतर 48 तासांच्या आत त्यांना सातारा जिल्ह्यातून तडीपार करण्यात येणार आहे. दरम्यान, अद्याप तडीपार प्रलंबितांची यादी मोठी असून अनेकांची तंतरली आहे. तसेच गणपती उत्सवही काही दिवसांवर येवून ठेपला आहे. या पार्श्‍वभूमीवर अनेकजण पोलिसांच्या रडारवर असून लवकरच त्याबाबतची पुढील कारवाई होण्याची शक्यता आहे.

नगरसेविकेचा मुलगा, उपसरंपचाचा समावेश..

एसपी पंकज देशमुख यांनी सातार्‍यात आल्यानंतर पहिल्या तडिपारीच्या कारवाईत दोघांवर कारवाई केली होती. दुसर्‍या कारवाईत एकूण आठ जणांना तडीपार केल्यानंतर अनेकांना धडकी भरली आहे. धक्‍कादायक बाब म्हणजे, गुरुवारी तडीपार केलेल्यांमध्ये दोघांना राजकीय पार्श्‍वभूमी आहे. यातील अमर आवळे याची आई सातारा नगरपालिकेत नगरसेविका असून, सध्या त्या सभापतिपदावर आहेत. याशिवाय, गणेश निंबाळकर हा कोंडवे गावचा विद्यमान उपसरपंच असल्याची माहिती समोर आली आहे.