Mon, Apr 22, 2019 03:40होमपेज › Satara › शिक्षण विभाग निधी खर्चात ‘नापास’

शिक्षण विभाग निधी खर्चात ‘नापास’

Published On: Mar 15 2018 1:20AM | Last Updated: Mar 14 2018 11:55PMसातारा : प्रवीण शिंगटे 

सातारा जिल्हा परिषदेच्या  सेस फंडातून प्राथमिक शिक्षण विभागाला 5 कोटी 41 लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र फेब्रुवारीअखेर अवघा 86 लाख 38 हजार निधी खर्च झाला असल्याचे कागदोपत्री दिसत आहे. त्यामुळे नेहमी चर्चेत असणारा शिक्षण विभाग निधी खर्चातही मागे राहिला असल्याने आता मार्च एंडिंगसाठी उरलेल्या 18 दिवसात हा निधी खर्च होणार का? याबाबत साशकंता व्यक्त होत आहे.

प्राथमिक शिक्षण विभाग स्वनिधीतून कोट्यवधी रुपयांचा निधी मिळूनही खर्च करण्याबाबत निद्रीस्त राहिला आहे. यशवंत गुरूकुल योजनेसाठी 20 लाखाचा निधी मंजूर होता, त्यापैकी फक्त 8 लाख रुपये खर्च झाले आहेत. प्राथमिक शाळेतील शिक्षक व शिक्षण  विस्तार अधिकार्‍यांना स्काऊट व गाईडचे प्रशिक्षण मेळाव्यासाठी 1 लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र शिक्षक व शिक्षण विस्तार अधिकार्‍यांना प्रशिक्षण केव्हा मिळणार हा प्रश्‍न अनुत्तरीतच  राहिला आहे.

शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमासाठी 25 लाख रुपयांची तरतूद केली होती. त्यापैकी 8 लाख 92 हजार रुपये खर्च झाल्याचे दिसत असले तरी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गुणवत्तेमधून विकास झाला का?  असा प्रश्‍न आहे. 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना संगणक पुरवण्यासाठी 65 लाख रुपयांची तरतूद केली होती. मात्र याबाबत संगणक खरेदीची कार्यवाही सुरू असली तरी नवीन शैक्षणिक वर्षापासून तरी सर्व शाळेमधील विद्यार्थ्यांना संगणकाचे धडे मिळणार का? असा प्रश्‍न पालकांना पडला आहे.

प्राथमिक शाळांसाठी डिजिटल क्‍लासरूम व संगणक, ई लर्निंगसाठी 65 लाख रुपयांची तरतूद केली असली तरी  काही शाळांमध्ये  असलेले संगणक धुळखात पडले आहेत, त्याचे काय? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

केंद्रशाळा वसतिगृह तळदेवसाठी 30 लाखापैकी 10 लाख रुपये खर्च झाले आहेत. महाबळेश्‍वर तालुक्यातील प्राथमिक शाळांना कोळसा पुरविणे व झडी बांधण्यासाठी 7 लाख रुपयांची तरतुद केली होती त्यापैकी 4 लाख 62 हजार रुपये खर्च झाले आहेत. ग्रंथालय सुरू करण्यासाठी 3 लाखाची तरतूद असून  शिक्षण विभागाकडून ग्रंथालयाची कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले.

तालुका, जिल्हास्तरावर विज्ञान प्रदर्शन भरविणे व शाळांना विज्ञान व शैक्षणिक साहित्य पुरवण्यासाठी 3 लाखाची तरतूद करण्यात आली होती त्यापैकी 1 लाख 90 हजार रुपये खर्च झाले आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील नादुरूस्त शाळांची  दुरूस्ती व संरक्षण भिंत बांधणे, पूर्ण झालेल्या  जुन्या कामांची थकीत बीले देण्यासाठी 46 लाख रुपयांची तरतुद करण्यात आली होती. मात्र आतापर्यंत 15 लाख 78 हजार रुपये खर्च झाले आहेत.मात्र झालेली कामे चांगल्या दर्जाची झाली आहेत का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

प्राथमिक शाळांमधील नादुरूस्त शाळांची नव्याने दुरूस्ती व नवीन संरक्षण भिंत बांधण्यासाठी 1 कोटी 4 लाख  32 हजार रुपयांची तरतूद केली असली तरी सर्वचा सर्व निधी अद्यापही शिल्लक आहे. केंद्रशाळा स्तरावर क्रीडा स्पर्धा, बालआनंद मेळावे व शिक्षण महोत्सव साजरा करण्यात प्राथमिक शिक्षण विभाग यशस्वी ठरला असून सर्वचा सर्व 22 लाख 30 हजार रुपयांचा निधी खर्च झाला आहे. 

जिल्हा परिषद शाळांना शालेय उपयोगी तसेच अध्यापन उपयुक्त साहित्य पुरवठा करण्यासाठी 4 लाख 24 हजार रुपये, प्रत्येक तालुक्यामध्ये किमान एक सेमी इंग्रजी माध्यमांची शाळा निर्माण करण्यासाठी 16 लाख 50 हजार रुपये, जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये किमान एक सौर शाळा तयार करण्यासाठी 22 लाख रुपये, प्रशासकीय रचना व कार्यपध्दती सुधारणा व ई गव्हर्नससाठी 2 लाख 63 रुपयांच्या मंजूर निधीपैकी सर्वचा सर्व निधी शिल्लक राहिला आहे.