Mon, Apr 22, 2019 12:00होमपेज › Satara › शिक्षित वर्ग अंधश्रद्धेच्या जोखडात ...

शिक्षित वर्ग अंधश्रद्धेच्या जोखडात ...

Published On: Feb 26 2018 1:18AM | Last Updated: Feb 25 2018 8:15PMकराड : अशोक मोहने

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात, सत्य असत्याशी मन केले ग्वाही। मानियले नाही बहुमता॥ पण सध्या समाजात पसरत असलेली अंधश्रद्धा पाहिल्यानंतर काय होतंय केलं म्हणून ? हीच मानसिकता शिक्षित म्हणवणार्‍या वर्गाची दिसून येत आहे. घर, गाडी यांना मिरच्या, लिंबू, बिबा असणारा तोटका किंवा काळी बाहुली उलटी टांगण्याचे प्रकार वाढले आहेत. लोकांच्या भित्र्या मानसिकतेचा गैरफायदा उठवत अंधश्रद्धा पसरवणार्‍या या वस्तूंच्या विक्रीचा गोरखधंदा सुरू आहे.

काही गुरू, बुवा, तांत्रिक, मांत्रिक यांच्याकडून फसवणुकीचे प्रकार समोर येत असले तरी त्यांना बळी पडण्याची संख्याही कमी होताना दिसत नाही.हाती घेतलेले कार्य सिद्धीस जावे म्हणून अंगारा-धुपारा यासारख्या क्लृप्त्या केल्या जातात.अशिक्षितांबरोबर शिक्षित वर्ग याला बळी पडत आहे. गाडी, घर यांना लिंबू-मिरची असणारा तोटका किंवा काळी बाहुली उलटी टांगण्याचे प्रकार वाढतच आहेत. हे बांधले म्हणून काय होतंय? असे म्हणून शिक्षितवर्गही याचे अनुकरण करताना दिसत आहे. पन्नास रुपयांपासून तीनशे रुपयांपर्यंत या बाहुलींची विक्री होते. तर लिंबू-मिरची असणारा तोटका पंचवीस ते पन्नास रुपयांपर्यंत विकला जातो. या तोटक्याला बांधण्यात येणारा बिबा फारसा उपलब्ध होत नसल्याने चिंचोका भिजून त्याला काळा रंग देवून बिबा म्हणून त्याचा सर्रास वापर अश्या वस्तू विक्री करणार्‍यांकडून होत आहे.

या शिवाय भूतबाधा घालवण्यासाठी लागणार्‍या वस्तू, करणी करण्यासाठी व गुप्तधन मिळवण्यासाठी काही वस्तू बाजारात मिळत आहे. जंगली वनस्पती महागडे ऊद, वनस्पतीपासून बनविलेल्या वेड्या वाकड्या वस्तू ही मोठ्या प्रमाणात विक्री होताना दिसून येत आहे. बाह्य शक्तीचा आपल्या घरावर, कार्यालयावर, उद्योगावर विपरीत परिणाम होऊ नये, या मानसिकतेतून व अंधश्रद्धेपोटी या वस्तू लोक खरेदी करत असल्याचे मत अंधश्रद्धा निर्मुलन अभ्यासक सुधीर कुंभार यांनी व्यक्त केले आहे.अंधश्रद्धेमुळे फसवणूक होत आहे. आर्थिक लुबाडणूक होत आहे, हे माहित असतानाही काही लोक त्याला बळी पडत आहेत.

काळी जादू, तंत्रमंत्र, जादूटोणा, नरबळी, भूतप्रेत, पिश्याच्य, यासंबंधी अफवा पसरवणारी व उपाय करणार्‍यांचे प्रस्तही वाढले आहे. अंधश्रद्धेमुळे निरपराध जीवांचे बळी दिले असल्याची उदाहरणे आहेत.काही ढोंगी लोकांमुळे जुन्या परंपरा व विचारसरणीचे प्रस्थ पसरत आहे. जिल्ह्यासह कराड शहरात विशेषकरून अंधश्रद्धेचे प्रस्थ मोठ्या प्रमाणात पसरले आहे. याचाच गैरफायदा घेत गंडेदोरे मंतरून देणार्‍यांचे फावले आहे.

याला कोणताही वैज्ञानिक आधार नसला तरी आणि यातून काहीही साध्य होत नाही. तरी काय होतंय हे केलं म्हणून असे तडजोडवादी युक्तिवाद शिक्षित म्हणवून घेणार्‍या वर्गाकडून केला जात आहे. बुवाबाजीचा मार्ग का व कशासाठी अवलंबतोय हे माहित नसले तरी दुसरा करतोय म्हणून अश्या मानसिकतेतील लोक ही दिसून येत आहेत.

काही डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक, शिक्षक हा बुद्धीवादी वर्ग अंधश्रद्धेच्या जोखडात अडकल्याचे दिसते.म्हणूनच नवीन बांधकाम झालेली इमारत असो, दवाखाना असो की स्वतःचे नावे घर असो यांच्या बाहेर काळी बाहुली उलटी करून लटकवल्याचे चित्र हमखास दिसते. ही मानसिकता विज्ञानवादी युगात कशी बदलणार? हाच एक यक्षप्रश्‍न आहे.

कराडात सुरू आहे छुपी विक्री...

कराड शहरात भाजी मंडईसह काही मोक्याच्या ठिकाणी अंधश्रद्धेला खतपाणी घालणार्‍या वस्तूंची छुपी विक्री होत आहे. या वस्तूंची किंमत काही हजारांच्या घरात आहे. गुप्तधन मिळवण्यासाठी व करणीसाठी लागणारे महागडे ऊद, जंगली वनस्पती व त्यांच्यापासून बनविलेल्या वस्तूंची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. तंत्रमंत्र यासाठी वापरल्या जाणार्‍या नारळाहून छोट्या वस्तूची किंमत पाचशे ते सातशे रुपये आहे. तर कुंडात टाकण्यासाठी वापरली जाणारी नरक्या वनस्पतीची किंमत काही हजारात आहे. या वस्तू ठराविक भागातील जंगलात मिळतात. या वस्तूंच्या बेकायदा विक्रीतून अनेकजण मालामाल झाले आहेत. या गोष्टींसाठी परराज्यातील टोळींची मदत घेतली जात असल्याचे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत काम करणार्‍या एका कार्यकर्त्याने सांगितले.       

सुशिक्षित लोकही अंधश्रद्धेला बळी पडत आहेत. त्यांचे अनुकरण अशिक्षित व  ग्रामीण भागातील लोक करत असतात. यामुळे फसवणूक तर होतेच शिवाय आर्थिक भुर्दंड बसतो.  लोकांनी अंधश्रद्धेला बळी न पडता विज्ञानवाद जोपासावा.
 - सुधीर कुंभार, अंधश्रद्धा निर्मूलन अभ्यासक.