Wed, Jun 26, 2019 12:10होमपेज › Satara › दूध प्रकल्पामुळे आर्थिक परिवर्तन : ना. खोतकर

दूध प्रकल्पामुळे आर्थिक परिवर्तन : ना. खोतकर

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सणबूर : वार्ताहर 

राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत दौलतनगर (ता. पाटण) येथील दूध उत्पादक व प्रक्रिया संघाने शिवशंभू दूध प्रकल्प उभारणीचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. यामुळे शेतकर्‍यांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन होणार असून या प्रकल्पाला सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही ना. अर्जुन खोतकर यांनी दिली.

लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्यांचे संस्थापक चेअरमन स्व. शिवाजीराव देसाई यांचे जयंती सोहळयानिमित्त ना. खोतकर पाटण तालुका दौर्‍यावर आले होते. त्यावेळी पाटणच्या शासकीय विश्रामगृहात दूध प्रकल्प उभारणीबाबत बैठक झाली. 

यावेळी आ. शंभूराज देसाई, पुणे येथील प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी महेश मुळे, पुणे येथील सह निबंधक सहकारी संस्था दुग्ध शिरापुरकर, जिल्हा दुग्ध व्यवसाय अधिकारी प्रकाश आवटे, सहाययक निबंधक सहकारी संस्था दुग्ध अमर झालरे, दुग्ध संकलन अधिकारी संजय पवार, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त विनोद पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

बैठकीत आ. शंभूराज देसाई म्हणाले, शिवशंभू दुध उत्पादक व प्रक्रिया संघाची महाराष्ट्र राज्य सहकारी कायदा 1961 अन्वये नोंदणी झाली आहे. 2006 पासून या दूध संघामार्फत दूध संकलन सुरु केले असून प्रतिदिन 800 लीटर दूध संकलन होते. सध्या तालुक्यामधून 7 रुटमधून एकूण 8 ते 10 हजार लीटर इतके दैनंदिन दूध संकलन करीत आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून दूध प्रकल्प उभारणीसाठी मान्यता मिळावी, यासाठी आपण जिल्हा दुग्ध विकास अधिकार्‍यांकडे प्रस्ताव सादर केला   असल्याचे आ. देसाई यांनी सांगितले.

यावर ना. खोतकर यांनी स्वत: लक्ष घालत सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.