सातारा : मीना शिंदे
राज्य सरकारच्या प्लास्टिक व थर्माकोल बंदीमुळे गणेशोत्सवामध्ये परंपरागत सजावटीचा बाज दिसणार असून कापडी व कागदी कला बहरणार आहेत. थर्माकोल सजावटीला मज्जाव असल्यामुळे परंपरागत सजावटीला प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे यंदा गणेशोत्सव खर्याअर्थाने पर्यावरणपूरक साजरा होणार आहे.
जिल्ह्यासह जगभरातील भाविकांचे नेत्र दीपवून टाकणार्या देखण्या सजावटीसाठी प्रसिद्ध असणार्या गणेशोत्सवावर यावर्षी प्लास्टिक व थर्माकोल बंदीचे सावट आल्यामुळे गणेशभक्तांमध्ये काहीशी नाराजीची भावना आहे. गणेशोत्सवाच्या काळात ‘बाप्पां’च्या सजावटीतील कलाकुसरीसाठी सर्वाधिक प्रमाणात वापरल्या जाणार्या थर्माकोलच्या वापरावर यंदा राज्य सरकारने बंदी आणल्यामुळे यंदाचा उत्सव वर्षानुवर्षे ओळख असणार्या थर्माकोलविनाच साजरा करावा लागणार आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्व साजरा होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
थर्माकोलच्या निर्मितीबरोबरच विविध कलाकृती बनवणार्या कारागिरांच्या पोटावर पाय येणार असल्याचे भयाण वास्तव पुढे आले आहे. सध्या गणेशोत्सवासह विविध उत्सव आणि प्रसंगांच्या सजावटीसाठी वापरले जाणारे थर्माकोल हे छोट्या-छोट्या कुटिरोद्योगांसह काही मोठ्या कारखान्यांमध्ये उत्पादित होते. गणेशोत्सवातील सजावटीच्या थर्माकोल निर्मितीत अधिक कारागीर गुंतलेले आहेत. थर्माकोल बंदीमुळे या सगळ्यांचेच भविष्य टांगणीला लागणार आहे.
पर्यावरणाच्या प्रदूषणात भर पडत असल्यामुळे राज्यसरकारने प्लास्टिकसह थर्माकोलच्या वापरावरही पूर्णतः बंदी घालण्याचा अध्यादेश नुकताच काढला. त्यामुळे गणेशोत्सव किंवा देव-देवतांच्या उत्सवामध्ये सजावटीसाठी देखील थर्माकोलचा वापर करता येणार नाही, असे या आदेशात स्पष्ट म्हटले आहे. जिल्ह्यासह राज्यभरात साजर्या होणार्या गणेशोत्सवात सजावटीवेळी या बंंदीचा परिणाम होणार आहे.
थर्माकोल बंदीमुळे देशी कलाकारांना मागणी वाढणार असल्याने त्यांच्या कलेला चांगला वाव मिळणार आहे. कापडी कागदी कला बहरणार आहे. काळाच्या ओघात लयास चाललेल्या परंपरागत वस्तूंना सजावटीमध्ये स्थान मिळणार आहे. पर्यावरणपूरक मातीच्या गणेश मूर्तींबरोबरच सजावटीसाठी कापडी मंडप व शोभेच्या वस्तूंना स्थान मिळणार असल्याने सहाजिकच स्थानिक परंपरागत व्यावसायिकांनाही सुगीचे दिवस येणार आहेत.कायदेशीर कारवाईचे गालबोट लागू न देण्याचा सार्वजनिक गणेश मंडळांचाही प्रयत्न राहणार आहे.