Tue, Mar 19, 2019 11:30होमपेज › Satara › साहेबांनाही म्हणाले होते, माझ्याकडं तीन तिकिटं 

साहेबांनाही म्हणाले होते, माझ्याकडं तीन तिकिटं 

Published On: Feb 24 2018 1:12AM | Last Updated: Feb 24 2018 1:12AM२००९ च्या लोकसभा निवडणुकीच्या काहीकाळ आधी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले भाजप सोडून काँग्रेसमध्ये गेले होते. त्यांना लोकसभा निवडणूक लढवायची होती. परंतु काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीमध्ये सातारा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडं असल्यामुळं उमेदवारी मिळणार नाही, हे त्यांच्या लक्षात आलं. त्याआधी त्यांनी वेगवेगळ्या निमित्तांनी दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. सगळीकडं उदयनराजेंची पोस्टर्स झळकली होती. त्यातून एक आव्हान उभं करण्याचा प्रयत्न होता.

राष्ट्रवादी काँग्रेससाठी आणि शरद पवारांसाठी निकराची निवडणूक होती. दिल्लीतल्या राजकारणात दबाव निर्माण करण्यासाठी एकेक जागा महत्त्वाची होती. शिवाय सातार्‍याला लागूनच माढा मतदारसंघ होता. तिथून शरद पवार उभे राहणार होते. उदयनराजेंना उमेदवारी दिली नसती तर त्यांनी सातारा आणि माढा अशा दोन्ही ठिकाणी उपद्रव दिला असता. हा उपद्रव परवडणारा नसल्यामुळे त्यांना अखेर सातार्‍यातून उमेदवारी दिली. अपेक्षेप्रमाणं मोठ्या मताधिक्क्यानं ते निवडूनही आले होते. निवडून आल्यानंतर त्यांनी पहिली जाहीर प्रतिक्रिया दिली, पक्ष गेला खड्ड्यात. मी पक्षबिक्ष काही मानत नाही. जनता हाच माझा पक्ष.

राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा धक्का होता. त्यानंतर उदयनराजे अनेक धक्के देत राहिले. कधी कधी पक्षाच्या बैठकीलाही ते जात नाहीत. अजित पवार यांच्यावर सातत्यानं टीका करत राहिले. मात्र शरद पवार यांच्यावर त्यांनी कधी व्यक्तिगत टीका केली नाही. एवढं सगळं होऊनही उदयनराजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहेत. खासदारकीच्या पाच वर्षांत उदयनराजेंनी पक्षाला खूप उपद्रव दिला. पक्षाने तो गुमान सहन केला. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा तसा. त्यामुळं  2014 च्या निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळणार नाही, अशी चर्चा सुरू झाली. बातम्या येत होत्या. आपलं तिकीट कापलं जाऊ शकते, याचा अंदाज उदयनराजेंनाही आला होता. त्यामुळं त्यांनी दबावतंत्र सुरू केलं. एकदा बोलता बोलता त्यांनी आव्हानच दिलं, कोण हायकमांड? मीच हायकमांड. असे असले तरी शरद पवारांकडे जाऊन त्यांचा हात डोक्यावर घ्यायचा आणि तुमचे आशीर्वाद असू द्या म्हणायचे, हेही त्यांना चांगलं जमतं. 

त्यांचा असाच एक किस्सा तर अफलातून आहे, तोही गेल्याच वेळच्या निवडणुकीअगोदरचा. त्याचं असं झालं, खा. उदयनराजेंच्या नम्रतेनं आणि अजिजिनं खुद्द शरद पवारही अवाक झाले होते. ते गालात हसले अन् पवारांना म्हणाले, साहेब, तुम्ही तिकीट दिलं नाही तर माझ्याकडं तीन तिकिटं आहेत.

कशाबद्दल बोलताहेत पवारांना काही समजेना. त्यांनी प्रश्‍न केला, कसली तिकिटं? त्यावर खा. उदयनराजे म्हणाले, पहिलं तिकीट ट्रेनचं. दुसरं विमानाचं आणि तिसरं एसटीचं. आणखी एक चौथं पिक्चरचं तिकीटही आहे माझ्याकडं.

मग तुमचं कसं काय, तुम्ही काय करणार? असं पवारांनी विचारल्यावर उदयनराजे म्हणाले, माझं काय, मी आहेच की. दर पाच वर्षांनी निवडणुका येतात. 

जर तुम्हाला माझ्यापेक्षा सरस उमेदवार सापडला तर त्याला तिकीट द्या. त्याचा प्रचारप्रमुख म्हणून मी काम करीन.

उदयनराजे असे गंमतीगंमतीनं बोलून दबाव टाकण्यात माहीर आहेत. शरद पवारांशी बोलताना पक्षातल्या आणि राजकारणातल्याही भल्या भल्यांची तारांबळ उडते. परंतु खा. उदयनराजे मात्र पवारांशी बोलता बोलता आपल्याला जे सांगायचं असतं, ते अगदी सहज सांगून टाकतात.

ते गेल्यावेळी निवडून आल्यानंतर एका पत्रकारानं त्यांना प्रश्‍न विचारला, हा पक्षाचा विजय की उदयनराजेंचा करिश्मा?

त्यावर पॉझ घेऊन ते पत्रकारांना म्हणाले, कार्ट्यांनो (हशा) असले घाणेरडे प्रश्‍न तुम्ही विचारणार हे मला माहीत होतं. (मोठा हशा)

थोडं थांबून ते पुढं बोलतात, हा लोकांचा करिश्मा आहे. उदयनराजे पॅटर्न हा फॅक्टरच आहे. कुणीपण असं जरी केलं, तसं जरी केलं, वसं जरी केलं, माणसं मोठी समजायला लागलेत समाजापेक्षा, असं सांगत त्यांनी बाजी पलटवून टाकली.