Tue, Apr 23, 2019 18:03होमपेज › Satara › इव्हीएम मशिनचा भाजपकडून गैरवापर : आनंदराव पाटील

इव्हीएम मशिनचा भाजपकडून गैरवापर : आनंदराव पाटील

Published On: Jun 02 2018 2:04AM | Last Updated: Jun 01 2018 10:54PMसातारा : प्रतिनिधी

आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत इव्हीएम मशीनचा गैरवापर भाजपा सरकारने केल्याचे उघड झालेले आहे. लोकशाही जर खर्‍या अर्थाने जिवंत ठेवायची असेल तर येथून पुढे होणार्‍या निवडणुका या बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी आ. आनंदराव पाटील  यांनी पत्रकार परिषदेत केली. दरम्यान, काहींनी काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये पदे घेवून सत्ता भोगली. मात्र, व्यक्तीगत फायद्यासाठी जर कोणी भाजपामध्ये जात असेल तर त्यांचा आम्ही निषेध करत असून जनता त्यांनी कधीच माफ करणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.

भाजपने देशातील जनतेचा विश्‍वासघात केला आहे. चार वर्षांपूर्वी  मोदींनी लोकांना भरपूर स्वप्ने दाखवली, आश्‍वासने दिली जनतेनेही  त्यांना मोठ्या प्रमाणावर मते दिली. सत्तेवर आल्यावर आपल्या  आशा आकांक्षा, दिलेली आश्‍वासने मोदी पूर्ण करतील  अशी अपेक्षा लोकांना होती. प्रत्येक वर्षी देशाची आर्थिक, सामाजिक स्थिती खालावत असताना केंद्रातील  आणि विविध राज्यातील भाजपची सरकारे जनतेच्या  पैशांवर हजारो कोटींच्या  जाहिराती देवून उत्सव साजरा करीत आहेत, हा नेमका कसला उत्सव आहे? देशातल्या सामान्य माणसाला उद्ध्वस्त केल्याचा? सिमेवर शहीद होणार्‍या  सैनिकांच्या  मरणांचा  की देशातल्या 45 हजार शेतकरी आत्महत्यांचा? काँग्रेस पक्षाने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशभरात या सरकारची पोलखोल  करण्याचा निर्णय घेतला असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले.

दररोज पेट्रोल व डिझेलची होणारी दरवाढ सर्वसामान्य माणसाला न परवडणारी आहे, असेही त्यांनी सांगितले. माथाडी कामगारांचा नेता म्हणून नरेंद्र पाटील यांना  शरद पवार यांनी आमदार केलं. मात्र, त्यांची मुदत संपायची आहे त्याअगोदरच  ते भाजपाच्या दिशेने जात आहेत. लोकांनी त्यांचा निषेध  करून  त्यांच्या हातातून  ग्रामपंचायत काढली असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले. यावेळी सौ. रजनी पवार, सौ. धनश्री महाडिक, रविंद्र झुटींग आदी पदाधिकारी उपस्थित होते.