Wed, Jul 17, 2019 20:05होमपेज › Satara › युवकाच्या त्रासामुळे युवतीची आत्महत्या

युवकाच्या त्रासामुळे युवतीची आत्महत्या

Published On: Jul 10 2018 1:04AM | Last Updated: Jul 09 2018 11:42PMखेड : वार्ताहर 

कृष्णानगर येथील आदित्यनगरी येथे रहिवासी असलेल्या किरण दशरथ सपकाळ (वय 24) या  युवतीने सोमवारी सकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली असून परळी वैजनाथ (जि. बीड) येथील युवकाच्या त्रासाला कंटाळून हे कृत्य केले असल्याचा आरोप नातेवाईकांनी केल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, सातारा शहर पोलिस ठाण्यात युवकाविरुद्ध तक्रार दाखल असतानाही पोलिसांनी योग्य ती कारवाई न केल्याने युवतीचा जीव गेला असल्याचा आरोप झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सोमवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास किरणचे वडील तिच्या लहान भावाला शाळेत सोडण्यासाठी गेले होते, तर आई घरात होती. यावेळी किरणसाठी शेजार्‍यांच्या मोबाईलवर फोन आला होता. या फोनवर ती कोणाशी तरी बोलली व त्यानंतर तिने आईला मोबाईलसाठी रिचार्ज आणण्यासाठी घराबाहेर पाठवले. आई बाहेर गेल्यानंतर किरणने घरातील लोखंडी अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आई घरी आल्यानंतर किरणने गळफास घेतल्याचे दिसून आले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. कुटुंबियांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. किरणला तशाच अवस्थेत जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

किरणने कॉम्प्युटर इंजिनिअरींगचा डिप्‍लोमा केला होता. सध्या ती एका ट्रॅक्टर शोरुममध्ये नोकरी करत होती. तिच्या लग्नासाठी आई वडिलांनी पुणे येथील मॅरेज ब्युरो या विवाह केंद्रामध्ये नावनोंदणी केली होती. दरम्यानच्या काळात परळी वैजनाथ जि. बीड येथील अभिनव मस्के या युवकाचे स्थळ आले होते. परंतु ते आई वडील व नातेवाईकांना पसंत नव्हते तर किरणनेही या स्थळाला नकार दर्शवला होता. असे असतानाही परळी येथील मस्के या युवकाने तिला लग्न करण्यासाठी गळ घातली होती. याबाबत तो तिला वारंवार फोन करत होता. काहीवेळा तर त्याने दमदाटी, शिवीगाळ करुन लग्नासाठी मागणी घालत होता.

परळी वैजनाथ येथील अभिनव मस्के याच्या या कृत्यानंतर सपकाळ कुटुंबिय तणावाखाली होते. खबरदारी म्हणून किरणच्या वडिलांनी दि. 18 एप्रिल 2018 रोजी सातारा शहर पोलिस ठाण्यात या युवकाच्या विरोधात तक्रार दिली असता पोलिसांनी त्यानुसार अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतरही मस्के हा वारंवार फोन करुन त्रास देत असल्याने किरण घाबरली होती. कारण संशयित युवकाने किरणला ‘तुझे लग्न होवू देणार नाही, तुला सोडणार नाही’ अशा धमक्या दिल्या असल्याचे समोर येत आहे.

सोमवारी किरण हिने आत्महत्या केल्यानंतर याप्रकरणी कुटुंबिय व नातेवाईकांनी संशयित अभिनव मस्के याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच शहर पोलिसांनीही संशयितावर कठोर कारवाई करणे गरजेचे असताना तसे न झाल्याने अखेर किरणला आत्महत्या करावी लागली असल्याची आरोप नातेवाईकांनी केला आहे. किरणच्या पश्‍चात लहान भाऊ, आई-वडील, आजी आजोबा असा परिवारआहे.