Mon, May 27, 2019 01:41होमपेज › Satara › महामार्गावर तिसर्‍या दिवशीही कोंडी

महामार्गावर तिसर्‍या दिवशीही कोंडी

Published On: Dec 26 2017 1:34AM | Last Updated: Dec 25 2017 10:37PM

बुकमार्क करा

सातारा/लिंब : प्रतिनिधी 

नाताळ व सलग सुट्ट्यांमुळे महामार्गावरील वाहतुकीचा वाढलेला ताण दिसर्‍या दिवशीही कायम होता. सोमवारी घराबाहेर पडलेल्या अनेकांनी पुन्हा परतीचा रस्ता धरल्याने वाहतुकीची कोंडी आणखी वाढली. त्यामुळे सातारा जिल्हा हद्दीतील महामार्गावर लिंबखिंड, वाढेफाटा व दोन्ही टोल नाक्यांवर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. 

सलग सुट्ट्यांमुळे महामार्गासह अन्य मार्गांवरील वाहतुकीवर प्रचंड ताण आला. सोमवारी वाहतुकीचा ताण आणखी वाढला. वाढेफाटा, लिंबखिंड व आनेवाडी, तासवडे टोलनाका येथे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. 

दरम्यान, नागेवाडी (ता. सातारा) येथे पुलाचे काम सुरू असल्याने गर्दी होत असते. महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडचे काम निकृष्ट दर्जाचे झालेले असल्याने त्या ठिकाणी रस्ता खचलेला आहे. सोमवारी सकाळी या ठिकाणचे खड्डे भरण्यास सुरुवात केली. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. 

तीन टोल नाक्यांवर दोन कोटींची उलाढाल

आनेवाडी टोल नाक्यावर तीन दिवसांत सव्वा लाख वाहनांची नोंद झाली असून, शिवापूर ते कराड या तिन्ही टोल नाक्यांवर अंदाजे दोन कोटी रुपयांची उलाढाल झाली. सोमवारी सकाळी दहा वाजता महामार्गावरील वाहतूक संथगतीने सुरू झाली आहे. सलग तीन दिवसांच्या वाहनांच्या गर्दीचे नियंत्रण भुईंज पोलिस ठाण्याचे कर्मचारी व वाहतूक पोलिसांनी केले.