Thu, Apr 25, 2019 23:28होमपेज › Satara › आ. शंभूराज देसाई यांनी उठवला आवाज; १० वर्षांपासून पुनर्वसन रखडले

बाटेवाडी (पाठवडे) गावावर डोंगर कोसळण्याची भीती

Published On: Dec 24 2017 1:46AM | Last Updated: Dec 23 2017 10:40PM

बुकमार्क करा

सणबूर : वार्ताहर

दहा वर्षापूर्वी अतिवृष्टीमुळे डोंगर खचला असून डोंगर उतारावर वसलेल्या बाटेवाडी (पाठवडे) या गावावर कडा कोसळण्याची टांगती तलवार आजही कायम आहे. त्यामुळे माळीणसारखी दुर्दैवी घटना घडण्याची चिन्हे असून गावातील 26 कुटुंबांचे त्वरित पुनर्वसन करा, अशी मागणी आ. शंभूराज देसाई औचित्याच्या मुद्द्याद्वारे विधानसभेत उपस्थित केला आहे.

पाटण तालुक्यातील मौजे बाटेवाडी (पाठवडे) या गावातील धोक्याच्या छायेत वास्तव्य करणार्‍या कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न औचित्याच्या मुद्दाद्वारे या तालुक्याचे आ. शंभूराज देसाई यांनी हिवाळी अधिवेशनात विधानसभेत मांडून या गंभीर प्रशानाकडे शासनाचे व विशेषत: मदत व पुनर्वसन मंत्र्यांचे लक्ष वेधले.यासंदर्भात बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले, मौजे बाटेवाडी (पाठवडे) हे गांव पाटण तालुक्यातील चाफळ विभागात डोंगर उतारावर वसलेले गाव आहे. जुलै 2007 मध्ये मोठया प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे या गावावरील डोंगर जमीन खचण्याचा प्रकार घडला आहे. त्यानंतर गेली दहा वर्ष अनेकदा अतिवृष्टी होऊन डोंगर खचण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे. या खचलेल्या डोेंगराचा भाग हा या गावातील  कुटुंब वास्तव्यास असणार्‍या घरावर कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. 

माळीण (जि.पुणे) या गावाप्रमाणे भयावह परिस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढला आहे. त्या  कुटुंबांचे तातडीने पुनर्वसन करणे गरजेचे असल्याने या तालुक्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने शासनाकडे सात्यत्याने या कुटुंबांच्या पुनर्वसनाची मागणी करीत आहे. आमच्या पाठपुराव्यामुळे भूवैज्ञानिक, भूजल सर्व्हेक्षण, सातारा यांनी पाटणचे प्रातांधिकारी, तहसिलदार यांना या कुटुंबांचे पुनर्वसन तातडीने करणे गरजेचे असलेबाबत पत्र व्यवहारही केला आहे. तर जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनही पुनर्वसनासंदर्भात महसूल तसेच वन विभागाशी पत्रव्यवहार देखील केला आहे. मात्र या गंभीर विषयाकडे राज्य शासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळेच त्या 26 कुटुंबाच्या पुनर्वसनाच्या कामास तात्काळ मंजुरी द्यावी. तसेच त्या कुटुंबाचे तात्काळ पुनर्वसन करावे, असा आग्रह आमदार शंभूराज देसाई यांनी विधानसभेत धरला.