Mon, Apr 22, 2019 11:40होमपेज › Satara › सलग सुट्ट्यांमुळे जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रे गजबजली

सलग सुट्ट्यांमुळे जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रे गजबजली

Published On: Dec 26 2017 1:34AM | Last Updated: Dec 25 2017 8:01PM

बुकमार्क करा

सातारा : सुनील क्षीरसागर

सलग सुट्ट्यांमुळे सातारा जिल्ह्यातील सर्वच पर्यटनस्थळे रेकॉर्डब्रेक गर्दीने फुलून गेली आहेत. शनिवार, रविवार व सोमवारी नाताळची सुट्टी असल्याने हजारो पर्यटक घराबाहेर पडले. अनेकांनी सुट्टीपूर्वीच पर्यटनाचा बेत आखला आणि तो पूर्णत्वासही नेल्याचे रेकॉर्डब्रेक गर्दीमुळे दिसून आले. 

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्‍वर, पाचगणीबरोबरच तीर्थक्षेत्र पुसेगाव, श्रीक्षेत्र पाली, शिखर शिंगणापूर, औंधचे जगप्रसिद्ध संग्रहालय, श्रीक्षेत्र मांढरदेव, श्रीक्षेत्र गोंदवले, सज्जनगड, चाफळ आदी ठिकाणी पर्यटकांनी गर्दी केली होती. गेले दोन दिवस महामार्गही वाहनांनी ओसंडून वाहिला. वाहनांच्या प्रचंड गर्दीमुळे अनेक ठिकाणी महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली.

काही ठिकाणी मेगा ब्लॉकचे प्रकारही घडल्याचे दिसून आले. यामुळे काही पर्यटकांच्या उत्साहावर विरजण पडले असले तरी पुन्हा त्याच जोमाने पर्यटकांनी तीर्थक्षेत्र पाहण्याचा आनंद लुटला. गोंदवले, पुसेगाव, म्हसवड, शिखरशिंगणापूर अशी जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रे एकाच टप्प्यात जवळजवळ असल्याने या तीर्थक्षेत्री पर्यटकांनी हजेरी लावून वेगळा आनंद लुटला. नुकताच पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराजांचा रथोत्सव पार पडला. सलग सुट्ट्या जोडून आल्यामुळे या यात्रेतही पर्यटकांनी रेकॉर्डब्रेक गर्दी केली होती.

पुसेगावमध्ये रेकॉर्डब्रेक गर्दी

नाताळ आणि सलग तीन दिवस शासकीय सुट्ट्या आल्याने पुसेगावमध्ये भरवण्यात आलेल्या रथोत्सवाला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. गोंदवले, म्हसवडकडे जाणार्‍या हजारो पर्यटकांनी तिकडे जाण्यापूर्वी सेवागिरी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. लाखो लोकांनी या रथोत्सवाला हजेरी लावली होती. सुट्ट्यांमुळे तीन दिवस गर्दीचा बहर होता. या गर्दीमुळे यात्रेत कोट्यवधी रूपयांची उलाढाल झाली.

यात्रेनिमित्त देवस्थान ट्रस्टतर्फे कुस्त्या, क्रिकेट, व्हॉलीबॉल, शरिरसौष्ठव, कबड्डी, श्‍वान रेस अशा विविध स्पर्धा, युवा महोत्सव आणि खिलार जनावरांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. यात्रेकरुंनी प्रत्येक कार्यक्रमाला भरभरुन प्रतिसाद दिला. तसेच  कृषी आणि पशुपक्षी प्रदर्शनालाही चांगला प्रतिसाद मिळाला. सुट्ट्यांमुळे पुसेगाव येथील यात्रेतील विविध कार्यक्रमांना शिखर शिंगणापूर, म्हसवड, गोंदवले येथे जाणार्‍या पर्यटकांनी हजेरी लावून यात्रेचा मनसोक्त आनंद लुटला. रविवारी तर पुसेगावमध्ये तुफानी गर्दी झाली होती. आकाश पाळणे, वॉटरपार्क, डायनॉसॉर आणि विविध खेळांचा आनंद लुटण्यासाठी बालगोपाळांसह युवक, युवतींनीही  हजेरी लावली.